तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
student-friends-drown-to-death : शहरालगतच्या टाकळी तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी 4 च्या दरम्यान घडली. यातील दोघे जाजू महाविद्यालयात बीएससी कॉम्प्युटरचे, तर अन्य एक अभियांत्रिकी शिक्षण घेत होता. बचाव पथकाने तिघांचाही तलावात दुपारपादसूनच शोध सुरू केला असता संध्याकाळी 7.30 वाजता तीन मृतदेह हाती लागले.
यात पीयूष विनोद यादव (19, पिंपळगाव), प्रथमेश सुनील यादव (20, बालाजी पार्क, पिंपळगाव) व प्रसाद नितीन सातपुते (19, बोरगावपुंजी ता. आर्णी) यांचा सामवेश आहे. सात विद्यार्थ्यांचा समूह सहलीसाठी गेला होता. त्यातील हे तिघेही दुचाकीने सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास टाकळी येथील तलाव परिसरात पोहोचले. तेथे फोटोशूट केल्यानंतर ते पोहण्यासाठी तलावात उतरले.
मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांची कॉलेज बॅग, कपडे, चप्पल काठावर पडून होत्या. टाकळी ग्रामस्थांना यावरून संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
महसूल पथक व बचाव पथक बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत असताना त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. टाकळी ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तिघांची ओळख पटल्यानंतर त्यांची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.
या घटनेने पिंपळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. पीयूष व प्रथमेश हे दोघेही चुलत भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. तर प्रसाद हा बोरगाव पुंजी येथून शिक्षणासाठी यवतमाळात आला होता, अशी माहिती ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेचा अधिका तपास ग्रामीण पोलिस ठाणेदार प्रवीण मानकर करीत आहेत.