गोंदिया रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीचा धडाका

255 प्रकरणांतून 1 लाख 34 हजारांचा दंड वसूल

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
गोंदिया,
gondia railway station विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासह प्रवाशांना रेल्वे नियमांचे पालन करण्याबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने गोंदिया रेल्वे स्थानकावर 17 ऑगस्ट रोजी नाका तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या विशेष मोहिमेत 24 रेल्वेगाड्यांची सघन तपासणी करण्यात आली. यावेळी 255 प्रकरणांतून तब्बल 1 लाख 34 हजार 395 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
 
 
gondia railway station
 
वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक दिलीप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक वाणिज्य प्रबंधक अरबिंद कुमार साव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. अभियानात 2 वाणिज्य निरीक्षक, 9 मुख्य तिकीट निरीक्षक, 23 सहायक तिकीट निरीक्षक आणि 2 एमटीएस कर्मचार्‍यांसह वाणिज्य विभागाच्या पथकाने सहभाग घेतला. तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवासाची 133 प्रकरणे आढळून आली. संबंधितांकडून 97 हजार 945 रुपये दंड वसूल करण्यात आला. अनियमित तिकीटाच्या 39 प्रकरणांतून 25 हजार 375 रुपये, तर विनाबुक केलेल्या सामानाच्या 82 प्रकरणांतून 9 हजार 75 रुपये दंड वसूल करण्यात आला. तिकीट तपासणी अभियानाचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून प्रवाशांनी नियमांचे पालन करून सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवास करावा, हा असल्याचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक दिलीप सिंह यांनी सांगितले.
 
 
वैध तिकीट घेऊनच प्रवास करणे ही प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी असून, अशा तपासणी मोहिम यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी योग्य व वैध तिकीट घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थानक परिसरात प्रवेश करण्यापूर्वी आवश्यकतेनुसार प्लॅटफॉर्म तिकीट घेणे आणि एका प्लॅटफॉर्मवरून दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी केवळ पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन केले.