गोंदिया,
madhya pradesh मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या दारूची वाहतूक करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सालेकसा तालुक्यातील टेभुटोला-पिपरीया मार्गावर सापळा रचून जेरबंद केले. आरोपींकडून विदेशी दारू, कार, आयफोन तसेच बनावट स्टिकर्स व इतर साहित्य असा 12 लाख 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजय सदाशिव राऊत (51) व योगेश गोपाल पांडे दोघेही राहणार बोरगाव मेघे, जि. वर्धा असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात परराज्यातून होणार्या अवैध दारू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक 16 ऑगस्ट रोजी सालेकसा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मध्यप्रदेशातून चारचाकी वाहनाने दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या आधारे पोलिसांनी टेभुटोला ते पिपरीया मार्गावर सापळा कारवाई केली. यावेळी पांढर्या रंगाच्या कारला थांबवून झडती घेतली असता डिक्कीमध्ये विदेशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. यावेळी कारमध्ये बसलेले आरोपी संजय राऊत व योगेश पांडे या दोघांना विचारणा केली असता मध्यप्रदेशातील लांजी येथून दारू व बिअर खरेदी करून महाराष्ट्रात आणत असल्याचे दोघांनी सांगितले.
तर मध्यप्रदेशातील स्टिकर्स काढून त्यावर बनावट महाराष्ट्राचे स्टिकर्स लावण्यात येत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली. तर टेभुटोला येथील एका घरातही दारूचा साठा ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान पोलिसांनी कार व घरातून विदेशी दारू व बिअरचे 34 बॉक्समधील 695 नग, किमत 2 लाख 73 हजार 910 रुपये, एक कार 8 लाख रुपये, आयफोन 50 हजार रुपये तसेच बनावट स्टिकर्स व इतर साहित्य 77 हजार 70 रुपये असा एकूण 12 लाख 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध सालेकसा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.