मालेगाव,
district collectors office तालुयातील पांगरी नवघरे येथील दोन वेगवेगळ्या प्रकरणातील अर्जदारांनी १५ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. कोल्ही शिवारातील येथील तापीनाथ महादेव संस्थानच्या जमिनीच्या कथित बेकायदा विक्रीप्रकरणी कारवाईची मागणी करीत शिवभक्त सतीष नवघरे तर मनरेगा अंतर्गत मंजूर विहीर प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही ऑनलाइन ‘पूर्ण’ दाखवून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करीत संजय मारोती नवघरे उपोषणाला बसले आहेत.
शिवभक्त सतीष हरिभाऊ नवघरे यांनी मौजे कोल्ही येथील गट क्रमांक ६१, सर्वे क्रमांक १८ मधील तापीनाथ महादेव संस्थान, तपोवन यांच्या मालकीची जमीन संबंधित व्यवस्थापकाने सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता परस्पर विक्री केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महसूल विभागाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही अद्याप अपेक्षीत चौकशी व कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संबंधित जमिनीचा फेरफार रद्द करून जमीन शासन अथवा देवस्थानच्या नावे जमा करावी, विक्री व्यवहाराची निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित विश्वस्ताने केलेल्या व्यवहाराची कायदेशीर तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत जमिनीवरील पुढील व्यवहारांना स्थगिती द्यावी, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.दरम्यान, पांगरी नवघरे येथील संजय मारोती नवघरे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वैयक्तिक लाभाच्या विहिरीचे काम प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही ऑनलाइन प्रणालीवर ‘पूर्ण’ दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे पुढील हप्ते मिळाले नसून सुमारे ९२ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.याबाबत पंचायत समिती, मालेगाव येथील गटविकास अधिकार्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही न झाल्याने त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे दाद मागितली आहे. विहिरीचे ऑनलाइन पूर्णत्व रद्द करून काम पुन्हा सुरू करावे, उर्वरित मंजूर निधी वितरित करावा, प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी-कर्मचार्यांवर कारवाई करावी आणि झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.दोन्ही आंदोलकांनी प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली असून, मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.