तभा वृत्तसेवा
पुसद,
rahul-narwekar : महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दूरदृष्टीने कृषी विकासाची पायाभरणी केली. राजकारण शेताच्या बांधावर नेऊन शेतकरी स्वावलंबी व समृद्ध व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते. आज विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर शेतकèयाला मजबूत केल्याशिवाय पर्याय नाही. कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करून देशाच्या विकासाची वाटचाल होऊ शकत नाही, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी केले.

येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वसंतराव नाईक यांच्या 47 व्या स्मृतिदिन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुधाकरराव नाईक सभागृहात झालेल्या या सोहळ्यास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्वागताध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी आमदार निलय नाईक, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार ख्वाजा बेग, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक, अनिता नाईक, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून दावोस येथे झालेल्या करारांमधून मोठ्या प्रमाणावर परकीय थेट गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. त्याच धर्तीवर कृषी क्षेत्रातही गुंतवणूक वाढली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकèयांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वसंतराव नाईकांनी महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी देशातील अन्नधान्य, दूध, भाजीपाला व फळ उत्पादनातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. वसंतराव नाईक यांच्या सिंचन धोरणाचा, महाबीजच्या स्थापना, रोजगार हमी योजना, कृषी विद्यापीठ स्थापना आणि कृषी संशोधनाला दिलेल्या चालनेचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी महाराष्ट्रातील विविध विभागांतील नऊ प्रगतशील शेतकरी तसेच दोन कृषी शास्त्रज्ञांचा शाल, शीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कार’ प्रदान करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रा. चंद्रकिरण घाटे यांच्या वंदन गीताने वातावरण भावविभोर झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रा. दिनकर गुल्हाने संपादित ‘चतुरस्त्र’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘शाबासकीची थाप’ या प्रशस्तीपत्रकाचेही विमोचन झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण व डॉ. माधवी गुल्हाने यांनी केले. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रा. गोविंद फुके यांनी आभार मानले.
गौरव पुरस्कारांचे मानकरी
प्रगतशील शेतकरी : संतोष पन्हाळे, अवंतिका विजय सुकळकर, यज्ञेश वसंत कातबने, माऊली जाधव, संगीता वाल्मिक सांगळे, शशांक पाटील, सुशांत मोहन नाईक, गोपाळ सूर्यभान भक्ते, अशोक वानखेडे (सुकळी, जि. यवतमाळ).
कृषी संशोधन संस्था : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.
कृषी शास्त्रज्ञ : डॉ. बाळकृष्ण जमदग्नी (नरसोबावाडी, जि. कोल्हापूर).