wildlife-exchange-proposal बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात बिबट्यासह अस्वल आणि विविध पक्षी सुरक्षित आणि खुल्या वातावरणात वावरत आहेत. परंतु या प्राण्यांना इतर प्राणिसंग्रहालयांमध्ये पाठविण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. याअंतर्गत गोरेवाड्यातील वाघ आणि बिबट्यांना हरयाणा, हिमाचल प्रदेश, नागालॅण्ड आणि पुणे येथील प्राणिसंग्रहालयांमध्ये पाठविले जाणार आहे. त्याबदल्यात नागालॅण्ड आणि हिमाचल प्रदेशातील काही वन्यप्राणी व पक्षी गोरेवाडा प्रकल्पात आणले जाणार आहेत. गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राण्यांची देशातील विविध प्राणिसंग्रहालयांमध्ये देवाण-घेवाण करण्याचा एक प्रस्ताव विचाराधीन होता. या प्रस्तावाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने वन्यप्राण्यांची देवाण-घेवाण होणार आहे.
हरयाणातील रोहतक येथे पाठविणार प्राणी
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला नागालॅण्ड प्राणी उद्यान, दिमापूर येथून एक नर व एक मादी हिमालयीन काळे अस्वल मिळणार आहे. तसेच रेणुकाजी लहान प्राणिसंग्रहालय, सिरमौर येथून दोन नर व दोन मादी रेड जंगल फाऊल आणण्यात येणार आहेत. हिमाचल प्रदेशातील रेणुकाजी लहान प्राणिसंग्रहालय, सिरमौर येथे एक नर व एक मादी वाघ पाठवण्यात येणार आहे. नागालँड प्राणी उद्यान, दिमापूर आणि पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्राला प्रत्येकी एक नर व एक मादी वाघ देण्यास मंजुरी देण्यात आली.