मुंबई
bank of baroda recruitment बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. बँकेने लोकल बँक ऑफिसरच्या तब्बल २,४८२ पदांसाठी नियमित तत्त्वावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठीचे अधिकृत जाहिरातपत्र बँकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
बँक ऑफ बडोदाकडून देशातील २० राज्यांमधील आपल्या शाखांसाठी लोकल बँक ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. अर्ज करण्यापूर्वी या पदासाठीची शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, स्थानिक भाषेची अट आणि राज्यनिहाय उपलब्ध जागांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
लोकल बँक ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँकेत किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करीत आहे, त्या राज्याची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे.
या पदासाठी उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२६ रोजी किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत तीन ते दहा वर्षांपर्यंत सवलत मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेशी संबंधित सर्व अटी १ ऑगस्ट २०२६ या आधार तारखेनुसार निश्चित करण्यात येणार आहेत.
किती जागा?
राज्यनिहाय जागांचा विचार करता गुजरातमध्ये सर्वाधिक १,१८५ पदे उपलब्ध आहेत. त्यानंतर कर्नाटकमध्ये ४१८, महाराष्ट्रात २१८, तमिळनाडूमध्ये १३२ आणि ओडिशामध्ये १०० पदे आहेत. आंध्र प्रदेशात ८०, तेलंगणात ५०, केरळमध्ये ४९, पश्चिम बंगालमध्ये ४२, आसाममध्ये ४०, पंजाबमध्ये ३४ आणि गोव्यात २१ जागा आहेत.
अरुणाचल प्रदेशात २० पदे असून जम्मू आणि काश्मीरमध्ये १५, मणिपूरमध्ये १५, मिझोराममध्ये १५ आणि नागालँडमध्ये १५ पदे आहेत. सिक्कीममध्ये १०, त्रिपुरामध्ये ८ पदे उपलब्ध आहेत. अशा प्रकारे देशातील २० राज्यांमध्ये लोकल बँक ऑफिसरच्या एकूण २,४८२ पदांवर भरती केली जाणार आहे.
बँक ऑफ बडोदाने ही भरती नियमित तत्त्वावर जाहीर केली असून पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. बँकिंग क्षेत्रात आधीच अनुभव असलेल्या आणि संबंधित राज्याची स्थानिक भाषा अवगत असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची ठरणार आहे.