दगड फोडणाऱ्या बापाच्या स्वप्नांची कहाणी

‘भाटा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
Bhata Marathi Movie पारंपरिक समाजरचनेत प्रत्येक समाजघटकाच्या कामाचे स्वरूप ठरलेले होते. मात्र, काळ बदलत गेला तसे या व्यवस्थेतही बदल झाले आणि नव्या पिढीने नवी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली. बेलदार समाजातील याच नव्या पिढीच्या स्वप्नांची आणि संघर्षाची कहाणी ‘भाटा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. उत्कृष्ट स्टारकास्ट असलेला ‘भाटा’ येत्या २८ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
 

Bhata Marathi Movie Beladar Community’s Story Set to Hit Theatres on August 28 
व्ही. डि. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. या निर्मिती संस्थेने ‘भाटा’ची निर्मिती केली असून सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण हे चित्रपटाचे निर्माते आहेत. रिजवान शेख, मितेश पराडकर आणि सुनील कातकर यांनी सहनिर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. भरतराज नारायण यादव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांची असून पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांनी लिहिले आहेत.
चित्रपटासाठी श्रेयस आंगणे यांनी गीते लिहिण्यासोबतच संगीताचीही जबाबदारी सांभाळली आहे. हरेश सावंत यांनी छायाचित्रण केले आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अरुण नलावडे, प्रशांत मोहिते, अभिनेत्री रुपाली जाधव, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण देवभट, प्रेमा किरण आणि बालकलाकार तनिष्का जाधव यांच्या दमदार अभिनयाची झलक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
पिढ्यानपिढ्या दगड फोडून उदरनिर्वाह Bhata Marathi Movie करणाऱ्या बेलदार समाजातील एका बापाचे आपल्या मुलांच्या भवितव्याबाबतचे स्वप्न ही या चित्रपटाची मध्यवर्ती कथा आहे. स्वतःचे आयुष्य कठीण परिस्थितीत गेले असले, तरी आपल्या मुलांना त्याच संघर्षातून जावे लागू नये, त्यांना शिक्षण मिळावे आणि चांगले भविष्य घडावे, अशी या बापाची इच्छा आहे. मात्र, त्याच्या या स्वप्नाच्या मार्गात गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि समाजातील पारंपरिक विचार उभे ठाकतात. या सगळ्याविरोधात संघर्ष करत मुलांना नवी दिशा देण्याचा त्याचा प्रयत्न ‘भाटा’मधून मांडण्यात आला आहे.
शिक्षण, नव्या पिढीची स्वप्ने तसेच प्रथा आणि परंपरा या विविध पैलूंना कथानकातून स्पर्श करत दिग्दर्शकाने प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक वास्तवाशी जोडलेली कथा, दमदार कलाकारांची फळी आणि भावनिक संघर्ष यामुळे ‘भाटा’चा टीझर लक्ष वेधून घेत असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता निर्माण झाली आहे.