मालेगाव,
bodiesof missing young man and woman तालुयातील गोकसावंगी येथून १४ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या २६ वर्षीय युवक महादेव गजानन निंबाळकर आणि १९ वर्षीय युवती निकिता संतोष कांबळे यांचे मृतदेह मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मोर्णा नदीवरील गोकसावंगी गावाजवळील धरणात आढळून आले. दोघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव निंबाळकर हे १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता गोकसावंगी येथील घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यांचे भाऊ सतीश गजानन निंबाळकर वय २९ यांनी १५ ऑगस्ट रोजी मालेगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नातेवाईक आणि मित्रांकडून त्यांचा शोध सुरू होता. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान, गोकसावंगी येथील १९ वर्षीय निकिता संतोष कांबळे ही देखील बेपत्ता झाल्याची तक्रार मालेगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
दोघांचा शोध सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी मोर्णा नदीवरील गोकसावंगी धरणात दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आवश्यक पंचनामा व इतर कार्यवाही केली. दोघांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा अद्याप उलगडा झालेला नसून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.