डेटिंग अँपवर ‘प्रेमाचा’ सापळा

डिनरनंतर मोबाइल लंपास, वृद्धाच्या खात्यातून २.२० लाख गायब

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली
Delhi Dating App Fraud राष्ट्रीय राजधानी दिल्लीत डेटिंग अॅपच्या माध्यमातून फसवणूक आणि मोबाइल चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या दक्षिण-पश्चिम जिल्ह्यातील सायबर पोलिसांनी या प्रकरणात दोन तरुणींना अटक केली आहे. ज्योत्सना (वय २६) आणि मानसी (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघीही दिल्लीतील रहिवासी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योत्सनाने बनावट ओळख निर्माण करून डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार केले आणि त्याद्वारे ६७ वर्षीय वृद्धाला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने या कटात मैत्रीण मानसीलाही सहभागी करून घेतले.
 

Delhi Dating App Fraud Two Women Arrested for Allegedly Stealing Elderly Man’s Phone and Rs 2.2 Lakh 
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योत्सनाने डेटिंग अॅपवर बनावट प्रोफाइल तयार करून वृद्धाशी संपर्क साधला. पुढे मानसीला त्या प्रोफाइलमागील महिला असल्याचे भासवून वृद्धाला भेटण्यासाठी तयार करण्यात आले. ठरलेल्या योजनेनुसार २४ जुलै रोजी डिफेन्स कॉलनीतील एका रेस्टॉरंटमध्ये दोन्ही तरुणींनी वृद्धासोबत जेवण केले. जेवणानंतर वृद्धाचा मोबाइल फोन चोरीला गेला.
मोबाइल हातात आल्यानंतर आरोपींनी वृद्धाच्या बँक खात्यांतून यूपीआयच्या माध्यमातून एक लाख ३० हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळवले. फसवणुकीतून मिळालेली रक्कम प्रथम एका आरोपीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आणि त्यानंतर ती दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली. याशिवाय एटीएमच्या माध्यमातून ९० हजार रुपये काढण्यात आले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही तरुणी पैसे काढताना दिसून आल्या. त्यामुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला. त्यानंतर बँक व्यवहारांचा मागोवा, केवायसी कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक निगराणीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवली.
चौकशीदरम्यान बनावट डेटिंग अॅप प्रोफाइल तयार करून पीडिताशी संपर्क साधणे आणि त्यानंतर दुसऱ्या तरुणीला प्रोफाइलधारक महिला असल्याचे भासवून भेटीसाठी पाठवणे, असा प्रकार उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात दोन्ही आरोपी २० जुलै आणि २४ जुलै रोजी पीडिताला भेटल्याचेही समोर आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चोरी केलेला मोबाइल फोन पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने नंतर नष्ट करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून प्रकरणाचा उलगडा केला असून, त्यांच्या ताब्यातून दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.