अक्षय खन्नाचा ‘शुक्राचार्य’ अवतार पाहून चाहते थक्क

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
मुंबई,
akshay khannas shukracharya avatar बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ अनुभवत आहे. 'दृश्यम २', 'चावा', 'धुरंधर' आणि 'इक्का' यांसारख्या यशस्वी चित्रपटांच्या मालिकेनंतर, तो आता प्रेक्षकांसमोर एका पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित अवतारात येण्याची तयारी करत आहे. अक्षय खन्ना पौराणिक कथेवर आधारित आगामी तेलुगू चित्रपट 'महाकाली'मधून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे की, या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टची पहिली अधिकृत झलक २४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केली जाईल.
 
akshay khannas shukracharya avatar
 
दिग्दर्शक प्रशांत वर्मा आणि आरकेडी स्टुडिओने "२४ ऑगस्ट - अंताची सुरुवात" या संदेशासह एक पोस्ट शेअर केल्यानंतर चित्रपट रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या संदेशासोबतच अक्षय खन्नाचा पौराणिक पात्र 'शुक्राचार्य'च्या भूमिकेतील पहिला लूक प्रदर्शित झाला असून इंटरनेटवर त्याचीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना राक्षसांचे महान गुरू आणि शक्तिशाली विद्वान असलेल्या शुक्राचार्याची आव्हानात्मक भूमिका साकारत आहे.
 
समोर आलेल्या फोटोंमध्ये लांब दाढी, डोक्यावर उंच बांधलेले विस्कटलेले केस, कपाळावरील त्रिपुंड्र, मोठा टिळा आणि पारंपरिक दागिन्यांमुळे अक्षय खन्नाला ओळखणे कठीण झाले आहे. त्याचा हा दरारायुक्त लूक आणि पुरातन पोशाख या पात्रातील क्रूरता व वर्चस्व स्पष्टपणे दर्शवतो. त्याच्या या शारीरिक परिवर्तनाने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी मार्च २०२६ मध्ये दिग्दर्शक प्रशांत वर्माने अक्षयच्या वाढदिवशी त्याचे कौतुक करताना तो एक खरा कलाकार असल्याचे म्हटले होते.
 
'महाकाली' हा चित्रपट प्रशांत वर्माच्या महत्त्वाकांक्षी सिनेमॅटिक युनिव्हर्सचा एक भाग आहे, ज्याची सुरुवात 'हनुमान'ने झाली होती. 'जय हनुमान' आणि 'अधीरा'सोबतच 'महाकाली' हा चित्रपटही पौराणिक कथेला आधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सची जोड देणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पूजा कोल्लुरु यांनी केले असून आरके दुग्गल आणि रिवाज रमेश दुग्गल यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अक्षय खन्नासोबत भूमी शेट्टी आणि रोहित सराफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.