‘त्या’ वाघाला चार दिवसात जेरबंद करा

वनविभागाच्या कार्यालयावर शेतकर्यांची धडक

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
तळेगाव (श्या. पं.),
forest department office नरसिंगपूर शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ नगरसेवक ॲड. मनिष ठोंबरे यांच्या नेतृत्त्वात शेतकर्यांनी वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढून त्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली. चार दिवसात वाघाला जेरबंद न केल्यास वनविभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.नागपंचमीच्या दिवशी शेतकरी रामभाऊ भोयर नरसिंगपूर शिवारातील शेतात पूजा करण्यासाठी गेले होते. पुजा सुरू असतानाच वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार मारले. या घटनेने परिसरात असंतोष निर्माण झाला. वाघाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान, आज बुधवारी नगरसेवक ॲड. ठोंबरे यांच्या नेतृत्त्वात शेतकर्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून रोष व्यक्त केला.
 
forest department office
 
यावेळी आ. सुमित वानखेडे यांच्यासोबत दूरध्वनीवर शेतकर्यांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, या विषयावर मुंबई येथे बैठक झाली असून लवकरच वाघाला जेरबंद करण्याची परवानगी शासन निर्गमित करेल, असे आश्वासन दिले. तसेच वर्धा येथील उप वनसंरक्षक यांच्याशी फोनवर संवाद साधण्यात आला. वाघाला जेरबंद करेपर्यंत वन विभागाचे कर्मचारी त्या शिवारात २४ तास गस्तीवर राहून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
दरम्यान, वनाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात वाघाला तात्काळ जेरबंद करावे, जंगल परिसराला फेंसिंग करून शेतकरी व शेतमालाच्या सुरक्षेची हमी द्यावी, शेतकर्यांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्या, चार दिवसात वाघाला जेरबंद न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
 
या आंदोलनात सुभाष मोकद्दम, अन्सार शेख, नरेंद्र भनेरकर, उत्तम बरगे, सागर ढोले, मंगेश बालपांडे, राहुल कठाने, विलास बानाईत, कैलास आडे, प्रमोद पाटील, शेषराव भोयर, आवेज खान, बबलू बोराडे, अशोक पाटणे, सागर सिनकर, दिगंबर मोकद्दम, विलास रघाटाटे, वसंत पोटे, मारुती कुंभारे, आदी शेतकरी उपस्थित होते. ...चौकट...
अन् गुराखी बचावला
 
तळेगाव शा. पंत परिसरातील नागपूर रोडलगत जंगलाला लागून असलेल्या पडीत शेतात बकर्या चारत असलेल्या गुराख्यापुढेच बकरीवर पट्टेदार वाघाने हल्ला केला. गुराखी रामाराव गुळभेले यांनी आरडाओरड केल्याने वाघाने बकरीला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या गुराखी थोडक्यात बचावला. ही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दोन-तीन दिवसांपूर्वी आष्टी परिसरात एकावर वाघाने हल्ला करून त्याचा जीव घेतला. त्यामुळे तळेगाव परिसरात हल्ला करणारा वाघ तोच आहे का, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.