एफबीआयकडून पंजाबचा मेजर सिंग फरार घोषित

जगू भगवानपुरिया टोळीशी संबंध असल्याचा दावा

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
FBI declares Punjab's Major Singh a fugitive अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) पंजाबमधील मेजर सिंग याला फरार घोषित केले असून, त्याचा संबंध जगू भगवानपुरिया यांच्या संघटित गुन्हेगारी नेटवर्कशी असल्याचा दावा केला आहे. हे नेटवर्क पंजाबपासून अमेरिकेपर्यंत विस्तारल्याचे एफबीआयने म्हटले आहे. लॉस एंजेलिससह अमेरिकेतील काही भागांमध्ये या टोळीचे नेटवर्क सक्रिय असल्याचेही तपास यंत्रणेच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.मेजर सिंगविरोधात अमेरिकेत गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर RICO म्हणजेच रॅकेटियर इन्फ्लुएन्स्ड अँड करप्ट ऑर्गनायझेशन्स कायद्यांतर्गत कट रचल्याचा आरोप आहे. याशिवाय परवाना नसलेल्या शस्त्रांची तस्करी करण्याचा कट आणि अंमली पदार्थांचा पुरवठा व विक्री करण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे.
 
 

FBI declares Punjab 
 
एफबीआयच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील अमेरिकेच्या फेडरल कोर्टात मेजर सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात २५ जून २०२६ रोजी अटक वॉरंट जारी करण्यात आले. सध्या अमेरिकन तपास यंत्रणा त्याचा शोध घेत असून, त्याच्याबद्दल माहिती असलेल्या नागरिकांनी ती एफबीआयपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, मेजर सिंगचा संबंध जगू भगवानपुरिया यांच्या संघटित गुन्हेगारी नेटवर्कशी आहे. पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या या नेटवर्कच्या कारवायांचा विस्तार नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर झाल्याचा एफबीआयचा दावा आहे. या नेटवर्कवर बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारीमध्ये सहभाग असल्याचे आरोप आहेत.
 
 
एफबीआयने मेजर सिंगची ओळख पटवण्यासाठी त्याच्याशी संबंधित शारीरिक माहितीही प्रसिद्ध केली आहे. त्याची जन्मतारीख २० जुलै १९९७ अशी नोंद करण्यात आली आहे. त्याचे राष्ट्रीयत्व भारतीय असल्याचे नमूद आहे. त्याची उंची अंदाजे ५ फूट ८ इंच असून वजन सुमारे १८२ पाउंड आहे. त्याचा रंग सावळा आणि डोळे काळे असल्याचे एफबीआयच्या वर्णनात सांगण्यात आले आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी जनतेकडून मिळणाऱ्या माहितीला महत्त्व असल्याने ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान, अमेरिकेत जगू भगवानपुरिया टोळीशी संबंधित नेटवर्कविरोधातही कारवाई सुरू आहे. अमेरिकेतील एका ग्रँड ज्युरीने जगू भगवानपुरिया आणि त्याच्या अनेक साथीदारांविरोधात गंभीर आरोप दाखल केले आहेत. या प्रकरणातून भारत, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोपर्यंत विस्तारलेल्या कथित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कची माहिती समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या आरोपपत्रानुसार, लॉस एंजेलिसमधून कॅनडातील व्हँकुव्हर येथे मोठ्या प्रमाणात कोकेन पोहोचवण्याच्या कथित कटात जगू भगवानपुरियाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. त्यामुळे मेजर सिंगविरोधातील कारवाईकडे भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कच्या तपासाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.