चंद्रपूर,
ghodnakappi जिवती तालुक्यातील दुर्गम घोडनकप्पी गावात गरोदर मातेला दवाखान्यात नेण्यासाठी मार्ग नव्हता. त्या घटनेनंतर तेथील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन जागे झाले. कोलमगुडा ते घोडनकप्पी या सुमारे 0.60 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या प्राथमिक कामासाठी 12.76 लाख रुपये, तर उर्वरित कामासाठी खनिज विकास प्रतिष्ठान अंतर्गत 44.70 लाख रुपये, अशी एकूण 57.46 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
घोडनकप्पी हे भारी ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे दुर्गम गाव असून, त्याची नोंदणीकृत लोकसंख्या 208 आहे. प्रत्यक्षात गावात सुमारे 15 ते 20 घरे आहेत. डोंगराळ भागात वसलेल्या या गावातील नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित दळणवळणाची सुविधा उपलब्ध नव्हती. हा रस्ता सध्या अवर्गीकृत व योजनाबाह्य असून तो वन विभागाच्या अखत्यारितील क्षेत्रातून जातो. त्यामुळे रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक वनविषयक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी वन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
रस्त्याच्या प्राथमिक विकासासाठी 15 ऑगस्ट 2026 रोजी विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजिविका हमी योजना लेखाशिर्षांतर्गत 12.76 लाख रुपयांच्या मातीकाम व मुरूम स्तरापर्यंतच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी अंदाजपत्रक तयार करून 17 ऑगस्ट 2026 रोजी 44.70 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. 19 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी यांनी, या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली. भारी गाव खनिजबाधित क्षेत्रात समाविष्ट असल्याने उपलब्ध निधीतून या परिसरातील मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिमेंट काँक्रीटचाच पर्याय
घोडनकप्पी हे गाव कोलमगुडा गावाच्या डोंगराच्या खालच्या बाजूस वसले आहे. येथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सरळ रेषेत रस्ता करणे व्यवहार्य नसल्याने आवश्यकतेनुसार वळणदार संरेखनाद्वारे सुरक्षित रस्ता विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक पर्जन्यमान आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून सिमेंट काँक्रीट रस्ता करावा लागणार आहे.