वाशीम जिल्ह्यात ‘स्मार्ट’ योजनेचा पहिला सौर प्रकल्प कार्यान्वित

राजू पारस्कर ठरले पहिले लाभार्थी

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
वाशीम,
first solar project under the smart scheme महावितरणच्या ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर’ योजनेअंतर्गत वाशीम जिल्ह्यातील पहिल्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन १८ ऑगस्ट रोजी पार पडले. चिखली बु. येथील रहिवासी राजू पारस्कर हे या योजनेचा लाभ घेणारे जिल्ह्यातील पहिले लाभार्थी ठरले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर उभारण्यात आलेल्या १ किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर यंत्रणेचे उद्घाटन महावितरणचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे पारस्कर यांची वीज बिलातून कायमची सुटका झाली आहे.
 
 
first solar project under the smart scheme
 
मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळात ही योजना राबवली जात आहे. यप्रसंगी कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती आणि सोलर शक्तीचे उमेश जोशी उपस्थित होते. अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी असलेल्या राजू पारस्कर यांना ५० हजार रुपये खर्चाच्या या १ किलोवॅट सौर यंत्रणेसाठी केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये तर राज्य शासनाकडून १० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष केवळ ५ हजार रुपयांचा लाभार्थी हिस्सा भरावा लागला.
 
 
‘स्मार्ट’ योजनेअंतर्गत १ किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसवल्यास घरगुती ग्राहकांना दरमहा १०० ते १२० युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५०० रुपये, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी ५००० रुपये, तर सामान्य प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास ग्राहकांसाठी १०,००० रुपये असा नाममात्र लाभार्थी हिस्सा निश्चित करण्यात आला असून, उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून दिली जात आहे. दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असणार्‍या ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता संदीप दरवडे यांनी याप्रसंगी केले आहे.