अमरावती
debt-free-farmers महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक स्वरूपाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना राबवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सन्मानार्थ भाजपा अमरावतीच्या वतीने सुमारे १० हजार कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्याला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे.
भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार प्रताप अडसड, तिवस्याचे आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी प्रदेश सचिव जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, मनपा सभागृह नेता चेतन गावंडे, जिल्हा सरचिटणीस नितीन गुडधे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेट घेऊन त्यांना शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण दिले. २७ सप्टेंबर रोजी या भव्य मेळाव्याचे अमरावती येथे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाभ झाला. या सर्व कर्जमुक्त शेतकऱ्यांना या मेळाव्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे.
कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधींद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांचा सन्मान केला जाणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्याकरिता उपरोक्त शिष्टमंडळातील सदस्यांसह आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, आमदार केवलराम काळे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष व भाजपा पदाधिकारी संयुक्तपणे काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर भाजपाच्या वतीने अमरावती येथे भव्य दहीहंडी स्पर्धा ’गोविंदा आला रे’ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. याचेही निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.