home minister महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण करणारा ‘होम मिनिस्टर’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम राहिलेला नाही, तर लाखो महिलांच्या आयुष्यात आनंद, आत्मविश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण करणारा प्रवास ठरला आहे. तब्बल २० वर्षे दररोज प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा कार्यक्रम आता नव्या रूपात आणि नव्या विचारांसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गेल्या दोन दशकांच्या या प्रवासात ‘होम मिनिस्टर’ने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असंख्य कुटुंबांशी नाते जोडले. आदेश बांदेकर यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य घरांना भेटी दिल्या. विविध शहरे, गावे आणि कुटुंबांपर्यंत पोहोचताना कार्यक्रमाने जवळपास २५ लाख किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासात असंख्य कुटुंबांच्या खास आठवणी कार्यक्रमाचा भाग बनल्या. बहिणी पुन्हा एकमेकींना भेटल्या, तर काही विभक्त कुटुंबांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक घराची वेगळी कहाणी आणि प्रत्येक ‘वहिनी’चा वेगळा संघर्ष ‘होम मिनिस्टर’ने जवळून अनुभवला.
या २० वर्षांच्या काळात ‘वहिनींना’ सुमारे ७५०० पैठण्या भेट म्हणून देण्यात आल्या. पैठणीला ‘महाराष्ट्राचा महासन्मान’ आणि ‘महाराष्ट्राची अस्मिता’ अशी ओळख मिळवून देण्यात ‘होम मिनिस्टर’चा मोठा वाटा राहिला आहे. प्रत्येक वहिनीच्या कपाटात पैठणी असेलच असे नाही; मात्र स्वतःच्या मेहनतीने आणि खेळ जिंकून मिळवलेली पैठणी तिच्यासाठी अभिमानाचा विषय ठरली. ‘महामिनिस्टर’ या विशेष पर्वात अंतिम विजेत्या वहिनीला तब्बल ११ लाख रुपयांची पैठणी देण्यात आली होती. या संपूर्ण प्रवासात साधारण २० ते २५ हजार महिलांच्या आयुष्यात कार्यक्रमाने आनंदाचे क्षण आणले.
‘होम मिनिस्टर’ने आदेश बांदेकर यांना महाराष्ट्राचा ‘भाऊजी’ अशी विशेष ओळख मिळवून दिली. आदेश बांदेकर आणि ‘होम मिनिस्टर’ यांच्यातील हे प्रत्येक घराशी जुळलेले नाते आजही तितकेच खास आहे. या प्रवासाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणतात, “होम मिनिस्टरच्या या प्रवासात महाराष्ट्राच्या असंख्य घरांमध्ये जाण्याची, तिथल्या वहिनींना भेटण्याची आणि त्यांच्या आयुष्यातले खास क्षण अनुभवण्याची संधी मला मिळाली. हा प्रवास माझ्यासाठी फक्त कार्यक्रमाचा प्रवास नव्हता, तर तो माणसांचा आणि नात्यांचा प्रवास होता. प्रत्येक वहिनीची आपली एक गोष्ट होती, तिचं एक स्वप्न होतं. त्या घरांमध्ये जाणं, त्यांच्या कुटुंबाला भेटणं आणि त्यांच्या सुख-दुःखाचा भाग होणं मला खूप आवडायचं. गेली दोन वर्षं मी हे सगळं खूप मिस केलं. या कार्यक्रमाला मी खूप मिस केलं. पुन्हा एकदा त्यांच्या घरी जाण्याची, त्यांच्या आयुष्यातला आनंद जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे, याचा मला खूप आनंद आहे.”
पुन्हा येणार आहे...
‘होम मिनिस्टर’च्या पुनरागमनाची घोषणा होताच पहिल्याच आठवड्यात १५ हजारांहून अधिक प्रवेशिका मिळाल्या. या उत्स्फूर्त प्रतिसादातून कार्यक्रमाशी जोडलेले प्रेक्षकांचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. एका महिलेने ‘होम मिनिस्टर’ची सुंदर व्याख्या करताना हा “सर्वसामान्य स्त्रीला आत्मविश्वास देणारा कार्यक्रम” असल्याचे म्हटले आहे.
याच विचाराला नव्या पर्वात आणखी व्यापक रूप देण्यात येणार आहे. यावेळी केवळ घर सांभाळणाऱ्या स्त्रीचा नव्हे, तर घर आणि संसार सांभाळतानाच स्वतःच्या कर्तृत्वाची नवी वाट निर्माण करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला जाणार आहे. गृहउद्योजिका असो, नोकरीसाठी दररोज घराबाहेर पडणारी स्त्री असो किंवा कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या पतीच्या अथवा सासूच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी स्त्री असो, तिच्या कष्टांचा, विचारांचा आणि योगदानाचा गौरव या नव्या पर्वात केला जाणार आहे.
‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो’, ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. मात्र, त्या स्त्रीच्या कर्तृत्वाचा, मेहनतीचा आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी तिने घेतलेल्या कष्टांचा गौरव करणे, हीच ‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची खासियत असणार आहे. त्यामुळे २० वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर नव्या विचारांसह परतणारा ‘होम मिनिस्टर’ प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा भावनिक आणि आपुलकीचा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.