देवरीत आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन सुरूच

आ. पुराम यांची भेट, विद्यार्थी मात्र, लेखी निर्णयावरच ठाम

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
मुल्ला,
indefinite protest by tribal students विविध शैक्षणिक, वसतिगृह, आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला सोमवार १७ ऑगस्टपासून सुरुवात केली असून बुधवारी १९ ऑगस्ट रोजी तिसर्या दिवशी या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला आहे. आंदोलनस्थळी आमदार संजय पुराम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आ. पुराम यांच्याकडे सुपूर्द केले. तर लेखी निर्णय जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशारा देत आंदोलन सुरू ठेवले.
 
 
indefinite protest by tribal students
 
वसतिगृहांमधील अपुर्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, आरोग्यसेवा, शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निवडीचे स्वातंत्र्य, प्रलंबित मागण्या तसेच वसतिगृहांमध्ये घडलेल्या मृत्यूच्या घटनांबाबत विद्यार्थ्यांनी आमदारांसमोर आपली भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आ. पुराम यांनी, विद्यार्थ्यांचे निवेदन आणि त्यांच्या मागण्या आपण गांभीर्याने घेत असून आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेऊन या सर्व समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. तसेच शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास स्पष्ट नकार दिला. आता आम्हाला आश्वासन नको, तर मागण्यांवर लेखी निर्णय हवा, अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी आमदारांसमोर मांडली. यापूर्वीही विविध स्तरांवर आश्वासने देण्यात आली असून, प्रत्यक्षात मागण्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे यावेळी शासनाकडून प्रत्येक मागणीवर स्पष्ट आणि लेखी निर्णय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले असून वृत्त लिहीपर्यंत आंदोलन सुरू होते.