कोलकाता
Kolkata Hotel Fire कोलकात्यातील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका हॉटेलमध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. या आगीत होरपळून नऊ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये सहा पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर ही आग लागल्याची माहिती आहे. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झा गालिब स्ट्रीटवरील जी+४ इमारतीत हे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्यांपैकी बहुतांश जण बांगलादेशच्या सीमावर्ती भागातील रहिवासी होते. उपचारासाठी ते बांगलादेशातून कोलकात्यात आले होते. रात्री तीन वाजल्यानंतर घटनास्थळावरून नऊ जणांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना कलकत्ता मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्घटनेत आणखी सहा जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी इमारतीतील सुमारे ६० जणांना कोणतीही दुखापत न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या सूत्रांनी आग पूर्णपणे विझवण्यात आल्याची माहिती दिली आहे.
या हॉटेलमध्ये आग विझवण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध नसल्याचा आरोपही केला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हॉटेलमधील एअर-कंडिशनरमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या कारणाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात Kolkata Hotel Fire धूर पसरला होता. धुरामुळे अनेक जण बेशुद्ध पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून, त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. ज्या भागात ही दुर्घटना घडली, तो न्यू मार्केटजवळील परिसर असून कोलकात्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांपैकी एक म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे या दुर्घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.