Mrutyuchakra Marathi Thriller प्रत्येक व्यक्तिरेखा ही कलाकाराला नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्याची संधी देत असते. विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे अभिनेते शशांक शेंडे आता आणखी एका आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मराठी थ्रिलर चित्रपट ‘मृत्यूचक्र’मधील त्यांच्या व्यक्तिरेखेचा लूक नुकताच रिव्हील करण्यात आला असून, त्यातील शशांक शेंडेंचा अंदाज विशेष लक्ष वेधून घेत आहे.
श्री महादेव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर प्रोडक्शन्स निर्मित ‘मृत्यूचक्र’ची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडु-गंगावणे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शशांक शेंडे ‘जना काका’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.
गावाकडच्या वातावरणाशी घट्ट नाते असलेले, मनमोकळे, आपुलकीचे आणि मिश्कील स्वभावाचे जना काका प्रेक्षकांना अगदी परिचित आणि आपलेसे वाटतील, अशी त्यांची व्यक्तिरेखा आहे. मात्र, ‘मृत्यूचक्र’मध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट तशीच असेल असे नाही आणि जना काकाही त्याला अपवाद नसल्याचे चित्रपटाच्या कथेतून सूचित होते. त्यांच्या सहज बोलण्यात, मिश्कील वागण्यात आणि परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काहीतरी गूढ दडलेले आहे. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जसजशा रहस्यमय होत जातात, तसतसा जना काकांचा खरा चेहरा जाणून घेण्याची उत्सुकताही वाढत जाते.
शशांक शेंडे यांनी या व्यक्तिरेखेला आपल्या अभिनयाची वेगळी धार दिली आहे. विनोद, सहजपणा आणि रहस्य यांचा सुरेख मिलाफ असलेले जना काका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, या व्यक्तिरेखेबाबत एक प्रश्न कायम राहतो—जना काका खरोखरच इतके साधे आहेत का? की त्यांच्या शांत चेहऱ्यामागे ‘मृत्यूचक्र’च्या कथानकातील एखादी महत्त्वाची कडी दडलेली आहे?
या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहावा लागणार आहे. ‘मृत्यूचक्र’ची मध्यवर्ती संकल्पनाच ‘प्रत्येक चेहरा एक कथा सांगतो… पण प्रत्येक कथा सत्य सांगतेच असं नाही!’ या गूढतेभोवती फिरताना दिसते. हा मराठी थ्रिलर चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.