शाळेच्या शिपायाकडून विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

पुसागोंदी आश्रमशाळेतील घटना : "पोक्सो" खाली नराधमाला बेड्या

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
 
POCSO नागपूर जिल्ह्यातील पुसागोंदी येथील भटक्या-विमुक्त समाजाच्या निवासी आश्रमशाळेत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या शिपायानेच विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
 
 
 
Nagpur Ashram School Sexual Abuse Case School Peon Arrested Under POCSO
 
कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील आश्रमशाळेत २४० विद्यार्थी शिक्षण घेत असून १५० विद्यार्थी निवासी आहेत. येथे ‘नाईट वॉचमन’ म्हणून काम करणाऱ्या राजेश मुलचंद मालापुरे (४४) याने एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला, तर दुसऱ्या विद्यार्थ्यावर गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका विद्यार्थिनीलाही अयोग्य स्पर्श केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्याने दाखवले धाडस, गुन्हा दाखल
पीडित विद्यार्थ्याने घाबरून न जाता धाडसाने हा सगळा प्रकार आश्रमशाळेच्या अधीक्षकांना सांगितला. अधीक्षकांनी विलंब न करता तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि ' चाईल्ड हेल्पलाइन'वर नोंद केली. घटनेचे गांभीर्य ओळखून काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपी शिपाई राजेश मालापुरे याला अटक केली. त्याच्याविरोधात पोक्सो कायदा, बाल न्याय अधिनियम आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल केले.
सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेबाबत आश्रमशाळा प्रशासनाची ही मोठी ढिलाई मानली जात आहे. रात्रीच्या वेळी नियुक्त कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी व वर्तणूक तपासणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या घटनेनंतर नागपूर जिल्ह्यातील इतर निवासी शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेची आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्याची जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.