नाशिक
nashik earthquake नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे परिसरात जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही.
मागील महिनाभरात नाशिक जिल्ह्यात ५ ते ६ वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. वारंवार जाणवणाऱ्या या हादऱ्यांमुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. सकाळच्या वेळी अचानक धक्के जाणवल्याने काही नागरिकांची धावपळही झाली. वारंवार होणाऱ्या भूकंपाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. सायंकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ इतकी नोंदवण्यात आली. दारिणी धार येथे त्याचा केंद्रबिंदू होता. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नाही. कांगडा आणि चंबा हे दोन्ही भाग भूकंपीय क्षेत्र-५ मध्ये येत असून, उच्च नुकसान जोखमीचे क्षेत्र म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला आहे.