नवी दिल्ली
NCB Drug Bust नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) परदेशी नागरिकांचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत NCBने एकूण १४.७८७ किलो अॅम्फेटामाइन, ६७.८४० किलो स्यूडोएफेड्रिन, ३१८ ग्रॅम कोकेन आणि ६ ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून, या अमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे १५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश एसटीएफकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर NCB आणि UP STFने १८ जुलै २०२६ रोजी दिल्लीतील राजू पार्क, खानपूर येथे संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ५.०८७ किलो अॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले आणि नायजेरियन नागरिक ओबासे प्रोस्पर ओगबोरोन्जोर याला अटक करण्यात आली. त्याचा वैद्यकीय व्हिसा जून २०२३ मध्ये संपल्यानंतरही तो भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे तपासात समोर आले. सुमारे ६८ लाख रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणात UP STFला तो वॉन्टेड होता.
यानंतर २१ जुलै रोजी गुरुग्राममधील हंस एन्क्लेव्ह येथे छापा टाकण्यात आला. तेथून ९.७ किलो अॅम्फेटामाइन आणि ६७.८४ किलो स्यूडोएफेड्रिन जप्त करण्यात आले. या कारवाईत नायजेरियन नागरिक अबुची जॉर्ज ओकोरी याला अटक करण्यात आली. त्याचा मेडिकल अटेंडंट व्हिसा जून २०१५ मध्येच संपला होता; त्यानंतरही तो भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळले.
तपासादरम्यान मिळालेल्या मागील दुव्यांच्या आधारे ३ ऑगस्ट रोजी दिल्लीतील महरौली येथील एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. तेथून ३१८ ग्रॅम कोकेन आणि ६ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. या कारवाईत उचेन्ना स्टीफन न्वांको आणि चिकीजी जोशुआ इग्वे या दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली. दोघेही १३ वर्षांहून अधिक काळ भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे तपासातून समोर आले.
कारवाईदरम्यान एका आफ्रिकन महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बचावासाठी तिने बाल्कनीतून उडी मारल्याने ती जखमी झाली. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची ओळख निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांचे अमली पदार्थ तस्करी नेटवर्कशी असलेले संबंध तपासण्यासाठी NCB सप्टेंबर २०२६च्या पहिल्या आठवड्यापासून ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ सुरू करणार आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या देशव्यापी मोहिमेत NCBसोबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची पोलीस यंत्रणा तसेच इमिग्रेशन अधिकारी सहभागी होणार आहेत. या मोहिमेदरम्यान परदेशी नागरिकांचा व्हिसा आणि इमिग्रेशन स्टेटस तपासण्याबरोबरच त्यांच्या संशयास्पद हालचाली आणि अमली पदार्थ तस्करी नेटवर्कशी असलेले संबंध तपासले जाणार आहेत. तस्करीत सहभागी असल्याचे आढळणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनीही गेल्या चार वर्षांत अमली पदार्थ माफियाविरोधात मोठी कारवाई करत १०,८६६ किलो अमली पदार्थ जप्त केले होते. या जप्तीची अंदाजे किंमत ६,७३८ कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती.NCBचे लक्ष केवळ अमली पदार्थांच्या खेपा पकडण्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण तस्करीचे नेटवर्क, त्यातील सूत्रधार, सहाय्यक आणि त्यांना मदत करणारी यंत्रणा उद्ध्वस्त करण्यावर आहे. परदेशी नागरिकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल, गेस्ट हाऊस, घरमालक आणि अन्य व्यक्तींनी त्यांच्या वास्तव्यासंदर्भातील कायदेशीर माहिती वेळेत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यावर NCBने भर दिला आहे. परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्यावर लक्ष ठेवणे हे केवळ इमिग्रेशन नियमांच्या अंमलबजावणीसाठी नव्हे, तर संघटित गुन्हेगारी आणि अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे NCBने स्पष्ट केले आहे.