ND Studio News बॉलिवूडमधील दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनानंतर कर्जतच्या खालापूर येथील एन. डी. स्टुडिओच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नितीन देसाई यांच्या निधनानंतर राज्य शासनाने या स्टुडिओचा ताबा घेतला होता. आता सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळांतर्गत एन. डी. स्टुडिओच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत चित्रपट निर्मात्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून स्टुडिओमध्ये शूटिंग आणि अन्य बाबींसाठी ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. चित्रपट निर्मितीला अधिक चालना देणे, निर्मात्यांचा चित्रीकरणावरील खर्च कमी करणे आणि एन. डी. स्टुडिओचा प्रभावीपणे विकास करणे, या उद्देशाने बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत चित्रीकरणासह अन्य सुविधांवर ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या सवलतीचा लाभ एन. डी. स्टुडिओतील थीम पार्कच्या प्रवेश शुल्कावरही मिळणार आहे. त्याचबरोबर चित्रीकरणासाठी स्टुडिओमध्ये येणारे निर्माते, कलाकार, कलादिग्दर्शक आणि इतर मान्यवरांसाठी उपलब्ध असलेल्या निवास व्यवस्थेवरही ही सवलत लागू होणार आहे. या माध्यमातून सांस्कृतिक पर्यटनालाही प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून एन. डी. स्टुडिओचा विकास करण्याच्या दृष्टीने भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचे संकेतही बैठकीत देण्यात आले.
या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांशी ND Studio News बोलताना ॲड. आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांच्या दुर्दैवी निधनानंतर स्टुडिओसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “आपले नितीन देसाई यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर स्टुडिओवरील कर्ज आणि सुविधा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक निर्णय घेतला आहे. सर्व आर्थिक देणी देऊन सरकारने या स्टुडिओची मालकी घेतली आहे. या स्टुडिओच्या बाबतीत आर्थिक घडी व्यवस्थित करून, चांगली व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.”
राज्याच्या सिनेसृष्टीला अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण आणणे आणि त्यातून स्थानिक कलाकार, कामगार तसेच सेवा क्षेत्राला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले. एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रीकरणाच्या संख्येत वाढ होण्यासोबतच महाराष्ट्राला देशातील प्रमुख सिनेमा निर्मिती केंद्र म्हणून अधिक बळकटी मिळण्यास या निर्णयाची मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.