अग्रलेख
terrorism दहशतवादाचा चेहरा सतत बदलत चालला आहे. पूर्वी बंदूक, बॉम्ब आणि सीमापार घुसखोरीच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात होता. आता त्याला सोशल मीडिया, ऑनलाईन संपर्क, आर्थिक आमिषे आणि स्थानिक तरुणांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्याच्या डावांची जोड मिळाली आहे. त्यामुळे आता दहशतवादाविरोधी लढाई केवळ सीमेवरची किंवा बंदुकीची राहिलेली नाही; ती आता मोबाईलच्या स्क्रीनवर आणि तरुणांच्या मनाच्या पातळीवरही लढावी लागणार आहे. शहजाद भट्टीशी संबंधित नेटवर्कवर झालेली मोठी कारवाई याच बदललेल्या आव्हानाची जाणीव करून देणारी आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पृष्ठभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत १४ राज्यांमध्ये २५३ संशयितांना अटक करण्यात आली. या कारवाईत ८० हून अधिक गुन्हे दाखल झाल्याचेही समोर आले आहे. संभाव्य घातपाती कारवाया रोखण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. महाराष्ट्रातही या नेटवर्कच्या संशयित संपर्कांवर दहशतवादविरोधी पथकाने यापूर्वी व्यापक कारवाई केली होती. राज्यात शंभरावर व्यक्तींची चौकशी आणि अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु, दहशतवादाचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी त्यामागील विचारसरणी, पैसा, संपर्काचे मार्ग, पद्धत आणि समाजातील कमकुवत दुवे शोधून काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीला अटक झाली म्हणून नेटवर्क संपत नसते. आणखी कोण-कोण हे शोधण्याची आणि मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. शहजाद भट्टी प्रकरणात दिसलेली सर्वांत चिंताजनक गोष्ट म्हणजे तरुणांना ऑनलाईन माध्यमातून लक्ष्य करण्याची पद्धत. महाराष्ट्र एटीएसच्या तपासात पाकिस्तानस्थित व्यक्ती सोशल मीडिया आणि अन्य ऑनलाईन माध्यमांचा वापर करून भारतीय तरुणांशी संपर्क साधत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याचा अर्थ दहशतवाद्यांना सीमारेषा ओलांडण्याची गरज उरलेली नाही. इंटरनेटला सीमा नसते आणि म्हणूनच त्याचा गैरवापर करणाऱ्या शक्तींना भारतीय समाजातील एखाद्या अस्वस्थ, एकाकी किंवा दिशाहीन तरुणापर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. ही बाब केवळ सुरक्षा यंत्रणांसाठीच नव्हे, तर समाजासाठीही गंभीर इशारा आहे.
तरुणांच्या मनातील अस्वस्थता दहशतवाद्यांसाठी संधी बनू नये, यासाठी समाजाने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. एखादा तरुण सतत कोणत्या ऑनलाईन समूहांमध्ये वावरतो, त्याच्या विचारांमध्ये अचानक टोकाचा बदल का होतो, त्याला अनोळखी व्यक्तींकडून आर्थिक मदत का मिळते, त्याच्या सोशल मीडिया व्यवहारात संशयास्पद बदल का होतात याकडे पालकांनी आणि संबंधित यंत्रणांनी संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. प्रत्येक तरुणावर संशय घेण्याची आवश्यकता नाही. संशय आणि पूर्वग्रह यांच्यातील सीमारेषा स्पष्ट ठेवणे तेवढेच आवश्यक आहे. दहशतवादाशी कोणत्याही स्वरूपात संबंध असल्याचे ठोस पुरावे आढळल्यास संबंधित व्यक्तींवर कठोरतम कारवाई झालीच पाहिजे. दहशतवादी कारवायांना मदत करणारे, कटात सहभागी असणारे, आर्थिक किंवा तांत्रिक साहाय्य पुरवणारे आणि जाणीवपूर्वक अशा नेटवर्कचा भाग बनणारे कुणीही कायद्याच्या वरवंट्यातून सुटता कामा नये. ही कारवाई ठोस पुरावे, सखोल तपास आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारेच झाली पाहिजे. निरपराध व्यक्तींना फक्त संशयाच्या आधारावर लक्ष्य न करता, प्रत्यक्ष सहभाग असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करणे हाच दहशतवादाविरोधातील प्रभावी आणि न्याय्य मार्ग आहे. देशाच्या सुरक्षेशी तडजोड नाही आणि दोषींना कोणतीही माफी नाही, असा स्पष्ट संदेश कारवाईतून गेला पाहिजे.
या कारवाईचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे केंद्र आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय. विविध राज्यांमध्ये एकाच वेळी कारवाई करणे, माहितीची देवाणघेवाण करणे, डिजिटल पुरावे तपासणे आणि संशयितांच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे यासाठी अत्यंत सक्षम यंत्रणा आवश्यक असते. अलिकडील कारवायांमध्ये हा समन्वय स्पष्टपणे दिसतो. महाराष्ट्र एटीएसनेही राज्यभर समन्वयित पद्धतीने तपास आणि छापेमारी केली. दहशदवाद्यांकडे पैसा कुठून येतो, तो कोणत्या खात्यांतून फिरतो, कोणत्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचतो आणि त्यासाठी कोणती डिजिटल साधने वापरली जातात, याचा मागोवा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दहशतवाद्याच्या हातातील बंदूक पकडण्याइतकेच त्याच्या हातात ती बंदूक पोहोचवणारे आर्थिक आणि डिजिटल मार्ग बंद करणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीपासून पुण्यासारख्या शिक्षण, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या शहरापर्यंत आणि भारताच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूरसारख्या संवेदनशील शहरापर्यंत आपल्या राज्याची सामाजिक आणि आर्थिक रचना अत्यंत व्यापक आहे. दहशतवादी नेटवर्ककडून महाराष्ट्रातील तरुण, तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार किंवा शहरी संपर्क व्यवस्था लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.terrorism पुणे आणि परिसरातही भट्टी नेटवर्कशी संबंधित संशयित संपर्काच्या मुद्यावर एटीएसने कारवाई केली होती. सुरक्षा यंत्रणांची सजगता ही नागरिकांसाठी आश्वासक बाब आहे. मात्र सजगतेचे रूपांतर निष्काळजीपणात होऊ नये. संशयास्पद ऑनलाईन संदेश, अनोळखी व्यक्तीकडून येणारी आर्थिक आमिषे, हिंसाचाराचे उदात्तीकरण करणारे समूह किंवा देशविघातक कारवायांकडे आकर्षित करणारे संपर्क आढळल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणांना देणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
दहशतवादाला बंदुकीने उत्तर देणे आवश्यक आहेच; पण त्याला विचारानेही उत्तर द्यावे लागेल. ज्या तरुणाला आपल्या समाजात आपलेपणा, संधी आणि संवाद मिळत नाही, त्याच्या मनातील पोकळी दहशतवादी भरून काढू पाहतात. म्हणून रोजगार, शिक्षण, कौशल्य, मानसिक आधार, सामाजिक सहभाग आणि राष्ट्रभावना या सर्वांचा दहशतवादविरोधी लढ्याशी संबंध आहे. राष्ट्रसुरक्षा ही केवळ पोलिसांची किंवा लष्कराची जबाबदारी नाही, ती समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. शहजाद भट्टीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची कारवाई ही सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेचा विजय आहे. परंतु हा विजय अंतिम नाही. नाव बदलेल, माध्यम बदलेल, संपर्काची पद्धत बदलेल आणि कदाचित लक्ष्यही बदलेल. म्हणूनच तपास यंत्रणांना सतत नवे तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि माहितीच्या अचूक विश्लेषणाची जोड द्यावी लागेल. आत्मघाती हल्ल्यांचे मनसुबे उधळले, शेकडो संशयितांना अटक झाली आणि मोठे जाळे उघडकीस आले, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मात्र या देशविघातक प्रवृत्तींना आळा घालताना कोणत्याही प्रकारची शिथिलता चालणार नाही. कारण या गुप्त कारवायांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेले असतात. दहशतवादाला केवळ प्रतिकार नव्हे, तर प्रतिबंध आवश्यक आहे. यासाठी गुप्तचर यंत्रणांचे जाळे अधिक तीव्र करून प्रत्येक संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सीमेवरची सुरक्षा मजबूत ठेवतानाच समाजाच्या अंतर्गत सुरक्षेची भिंतही भक्कम करावी लागेल. युवकांचे वैचारिक खच्चीकरण आणि ब्रेनवॉशिंग रोखण्यासाठी योग्य प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. भारताने दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुतेची भूमिका कायम ठेवली पाहिजे. त्याच वेळी निरपराध नागरिकांचे स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य आणि सामाजिक सलोख्याचेही रक्षण केले पाहिजे. भारताची खरी ताकद केवळ त्याच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये नाही. ती त्याच्या एकात्मभावाने जगत असलेल्या समाजात आहे. विविधतेत एकता हीच आपली ओळख असून ती कमकुवत करण्याचे प्रयत्न हाणून पाडावे लागतील. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळणे आवश्यक आहेच; पण अशी मनोवृत्ती जन्मालाच येऊ नये आणि कोणताही तरुण अशा मार्गाला लागू नये, अशी समाजव्यवस्था उभी करणे हे त्याहून मोठे राष्ट्रीय कार्य आहे. या पवित्र कार्यात प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून राष्ट्र सुरक्षेच्या कार्यात योगदान देणे आवश्यक आहे. प्रतिकाराहून प्रतिबंध महत्त्वाचा ठरतो तो त्यासाठीच