शहराच्या प्रवेशद्वारावर कचर्‍याचे साम्राज्य राधेश्याम चांडक यांचे पालकमंत्र्याना निवेदन

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
बुलढाणा,
radheshyam chandak शहराच्या प्रवेशद्वारांवर कचर्‍याचे ढिग, दुर्गंधी, मोकाट गुरेढोरे आणि मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. शहराला जोडणार्‍या प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांसह शहरात येणार्‍या पाहुण्यांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिका, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचे निवेदन बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष यांनी जिल्हाधिकार्‍यामार्फत पालकमंत्री मकरंद पाटील यांना दिले आहे.
 
 
radheshyam chandak
 
शहरांशी जोडणार्‍या प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचल्याचे चित्र आहे.या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यालगत कचरा टाकणारे कोण आहेत. याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायती आणि नगरपालिकेने नियमित स्वच्छता व्यवस्था राबवून कचर्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून नागरिकांकडून महसूल वसूल केला जात असताना मूलभूत स्वच्छता सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाचीच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मोकाट गुरांमुळे अपघाताचा धोकाकचर्यासोबतच शहरातील मोकाट गुराढोरांचा प्रश्नही गंभीर झाला आहे. प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा आणि रहिवासी भागांत मोकाट गुरे मोठ्या संख्येने फिरताना दिसतात. अनेकदा ही गुरे रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसतात किंवा अचानक वाहनांसमोर येतात. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पदचार्‍यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
 
 
मोकाट कुत्र्यांची दहशतशहरातील मोकाट कुत्र्यांची संख्याही वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळी फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना कुत्र्यांच्या टोळ्यांचा त्रास सहन करावा लागतो. कुत्रे नागरिकांच्या मागे लागणे, वाहनांचा पाठलाग करणे आणि अचानक वाहनांसमोर येणे यामुळे अपघाताची शयता वाढली आहे. कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांनाही आळा घालण्यासाठी कायदेशीर व मानवीय पद्धतीने प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी विविध महाविद्यालये सुरू झाली आहेत.
 
 
राज्यातील तसेच परराज्यातील सुमारे हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नात थेट हस्तक्षेप करून सर्व संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी होत आहे. जिल्हा नियोजन बैठकीच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून कचरा व्यवस्थापनासाठी निधीची तरतूद करावी, शहर व शहराला जोडणार्या सर्व प्रमुख रस्त्यांवरील कचरा तातडीने हटवावा, नियमित स्वच्छता व्यवस्था राबवावी शहराची स्वच्छ व सुंदर ओळख पुन्हा प्रस्थापित व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी राधेश्याम चांडक यांनी केली आहे.