गोंदियात वाहतूक नियमभंगाचा धुमाकूळ

सात महिन्यांतच ३२ हजार ६८८ प्रकरणे- ४ कोटी २४ लाखांचा ठोठावला दंड

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
गोंदिया,
rampant traffic rule violation in gondia जिल्ह्यात वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असतानाही नियमभंगाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. यंदा १ जानेवारी ते ३१ जुलै या अवघ्या सात महिन्यांतच तब्बल ३२ हजार ६८८ वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहनचालकांवर तब्बल ४ कोटी २४ लाख २१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
 
rampant traffic rule violation in gondia
 
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यासोबतच शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सुरळीत ठेवणे, बेकायदा पार्किंगला आळा घालणे आणि वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, कारवाईची आकडेवारी पाहता नियम तोडणार्या वाहनचालकांची संख्या चिंताजनक असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. वाहतूक नियमभंगाच्या कारवाईत राँग साईडने वाहन चालविण्याची तब्बल १९ हजार २३ प्रकरणे समोर आली. या प्रकरणात १ कोटी ३६ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या २ हजार ७३० प्रकरणांत ७४ लाख ५६ हजार २०० रुपये, तर ट्रिपल सीट वाहन चालविल्याच्या ३ हजार १९१ प्रकरणांत ३१ लाख ९१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
 
 
सिग्नल तोडण्याच्या ३ हजार २१८ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८६ लाख ३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याच्या ९५५ प्रकरणांत १६ लाख ३५ हजार रुपये, तर हेल्मेट न वापरल्याच्या १ हजार ८३० प्रकरणांत १७ लाख ३१ हजार ३४८ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ओव्हरस्पीडच्या १६३ प्रकरणांत ३२ लाख ५४ हजार रुपये, विना इन्शुरन्स वाहन चालविल्याच्या १०९ प्रकरणांत २ लाख २२ हजार रुपये, तर फॅन्सी नंबर प्लेटच्या ९६ प्रकरणांत ९६ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याच्या २५ प्रकरणांत तब्बल १२ लाख ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सीट बेल्ट न लावता वाहन चालविण्याच्या १ हजार ३४८ प्रकरणांत १३ लाख ४८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  
दंड वसूल करण्याचे आव्हान...
वाहतूक नियमभंग करणार्यांवर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात केवळ २० ते २२ टक्के दंडाची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे दंड ठोठावण्यापेक्षा त्याची प्रभावी वसुली कधी होणार? हा प्रश्न उपस्थित होत असताना वाहतूक पोलिसांसमोर सदर दंड वसूल करण्याचे आव्हान आहे.
 
 
वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्यासाठी नियमभंग करणार्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यावरही भर दिला जात आहे.
- नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष, गोंदिया