सेलू,
wardha district यावर्षी पावसाळा शेतकर्यांसह सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यातील एकाही नक्षत्रात समाधानकारक पाऊस आलेला नाही. आता मघा नक्षत्र सुरू झाले. परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडेल ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र, सरी बरसत नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची भीती असून जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकर्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. त्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिके वाढीच्या अवस्थेत असून आता दमदार पावसाची आवश्यकता आहे. दररोज आकाशात ढग जमा होत असल्याने पाऊस येईल, अशी आशा शेतकर्यांना वाटते. मात्र, ढगाळ वातावरणानंतरही पाऊस न पडल्याने शेतकर्यांच्या पदरी निराशा येत आहे. आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शयता आहे.
सेलू तालुयात मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात एक दिवस दमदार पाऊस आला. पुष्य अन् आश्लेषा नक्षत्र कोरडे गेले अत्यल्प पावसावर शेतातील पिकं तग धरून असून या नक्षत्रात पाऊस आला नाही तर खरीप हंगाम हातातून जाणार असल्याची भीती शेतकर्यांना वाटत आहे. पावसाचे सर्वच नक्षत्र हुलकावणी देत असून तालुयातील नदी नाले कोरडे पडले आहे शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी पावसाळ्यात कमी होताना पहावे लागत आहे. शेतकरी सारखा आकाशामध्ये असलेल्या ढगाळ वातावरणाकडे पाहून आस लावून आहे. पण, पाऊस काही येईना. त्यामुळे हतबल झालेला शेतकरी यावेळेस कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना असे बोलत आहे.