चेन्नई
Tamil Nadu Big Announcements तमिळनाडू सरकारने राज्यातील नागरिक, दूध उत्पादक आणि आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री व्यापक आरोग्य विमा योजनेअंतर्गत उपचारांसाठीची वार्षिक मर्यादा पाच लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर दूध उत्पादकांना दिलासा देत दूध खरेदीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयांचा थेट लाभ लाखो नागरिक आणि दूध उत्पादकांना मिळण्याची अपेक्षा आहे.
सरकारने दूध उत्पादकांसाठी दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३८ रुपयांवरून ४१ रुपये केला आहे. या निर्णयाचा सुमारे ३.१६ लाख दूध उत्पादकांना फायदा होण्याची शक्यता आहे. याशिवाय दूध उत्पादकांना मिळणारे सरकारी प्रोत्साहनही प्रतिलिटर तीन रुपयांवरून पाच रुपये करण्यात आले आहे. दूध खरेदीचा दर वाढवल्यामुळे सरकारवर दरमहा सुमारे ३० कोटी रुपये आणि वर्षाला ३६० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्री व्यापक आरोग्य विमा योजनेशी संबंधित आहे. या योजनेत उपचारांसाठीची वार्षिक विमा मर्यादा पाच लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना अधिक आर्थिक संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे.याशिवाय ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी अतिरिक्त वैद्यकीय आणि शस्त्रक्रियाविषयक सेवांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. चेन्नई, तिरुनेलवेली, तुत्तुकुडी, चेंगलपट्टू यांसह राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.