श्री गजानन विद्यालयातून वृक्षलागवडीचा जागर

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
नागपूर,
shri gajanan vidyalaya पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीचा संदेश समाजात पसरवण्यासाठी श्री गजानन विद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ या विशेष उपक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भव्य रॅली काढून वृक्षारोपणाबाबत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती केली. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती रॅली काढली. हातात पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणारे फलक घेऊन “एक पेड माँ के नाम”, “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” अशा जोरदार घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दुमदुमून टाकला.
 
ek ped maa ke naam
या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीच्या आयोजनात सक्रिय पुढाकार घेतला, तर इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रॅलीनंतर न्यू सुभेदार लेआउट येथील तारा ग्राउंड येथे मुख्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. श्री गजानन बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका कीर्ती चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना झाडांचे जतन करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक कमलाकर तंबाखे, उपमुख्याध्यापक मनोज अग्रवाल, पर्यवेक्षक पुरुषोत्तम कावटे, 'इको क्लब' (ECO Club) समन्वयक सुदर्शन गोस्वामी तसेच निलेश चौधरी, सुचित्रा पोकळे आणि उज्ज्वला यावलकर हे प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गाविषयी प्रेम, पर्यावरण संवर्धनाची आवड आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजावी, या मुख्य उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.