मुंबई
Tricolour Cake Controversy महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आणि केरळमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी तिरंग्याच्या आकाराचा केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्यासपीठ ‘एक्स’वर पोस्ट केल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडिओवरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
चेन्निथला यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना, “हा अभिमानाचा क्षण असून जबाबदारीची जाणीव करून देणारा देखील आहे,” असे म्हटले. स्वातंत्र्यदिनानिमित्त केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (KPCC) मुख्यालयात सहकाऱ्यांसह तसेच सेवा दलाच्या स्वयंसेवकांसोबत तिरंगा फडकावल्याचे त्यांनी सांगितले. “आपण ज्या ध्वजाला सलाम करतो, तो आपल्याला जपण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या भारताची नेहमी आठवण करून देत राहो. हा भारत स्वतंत्र, लोकशाहीवादी, न्याय्य आणि एकसंध असावा,” असेही त्यांनी नमूद केले. “जय हिंद,” अशा शब्दांत त्यांनी पोस्टचा समारोप केला.
दरम्यान, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावरून काँग्रेस आणि रमेश चेन्निथला यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. तिरंग्याचा केक बनवून तो कापला जात असल्याबद्दल काँग्रेस आणि चेन्निथला यांनी लाज वाटली पाहिजे, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अशा प्रकारचे कृत्य मान्य आहे का, असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला. अशा घटनांमध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी करताना चेन्निथला यांना केरळच्या गृहमंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणीही त्यांनी केली.वंदे मातरम्च्या मुद्द्यावरूनही बावनकुळे यांनी काँग्रेसवर आरोप केले. मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे काँग्रेस वंदे मातरम्चे केवळ दोन अंतरे गाण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी दोन अंतरे गायली जात असताना कायदा नव्हता; मात्र आता सभागृहात कायदा पारित झाला आहे, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशाला वंदे मातरम् गायचे आहे, मग काँग्रेसला त्यावर आक्षेप का, असा सवाल बावनकुळे यांनी केला.काँग्रेसचे लक्ष केवळ मुस्लिम मतपेढीवर असून त्याच तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे पक्ष वंदे मातरम्ला विरोध करत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. वंदे मातरम्चा अपमान करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
याचवेळी महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचाही बावनकुळे यांनी उल्लेख केला. महाराष्ट्रात २८ ऑगस्टपासून धर्मस्वातंत्र्य कायदा लागू करण्यात येणार असून, या कायद्याचा महिलांना निश्चितच फायदा होईल, असा दावा त्यांनी केला.