अमरावती
umesh-kolhe-murder-case येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक ८ अब्दुल अरबाज अब्दुल सलीम याचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला. विशेष सत्र न्यायाधीश चकोर एस. बावीस्कर यांनी हा आदेश दिला.
आरोपी अब्दुलने जामिनासाठी अर्ज दाखल करताना आपली कोणतीही थेट भूमिका नसल्याचा तसेच तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाले असतानाही आरोप निश्चित झालेले नसल्याने दीर्घकाळ कारावासात असल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र, एनआयए फिर्यादी पक्षाने या युक्तिवादाला तीव्र विरोध केला.
अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपी अब्दुल हा इतर सहआरोपींसोबतच्या कटातील बैठकीत सहभागी झाला होता. हत्येनंतर त्याने प्रत्यक्ष हल्लेखोरांना पळून जाण्यास मदत केली तसेच त्यांना अमरावतीबाहेर नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. तपास यंत्रणेने आरोपीच्या भूमिकेच्या समर्थनार्थ साक्षीदारांचे जबाब, सीडीआर, एसडीआर तसेच इलेक्ट्रॉनिक व तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर मांडले होते. एनआयएच्या म्हणण्यानुसार, सुमारे २१ साक्षीदारांनी आरोपीच्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे.
न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांचा विचार करून आरोपीने हत्या करण्याच्या कटाच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेतल्याचे तसेच प्रत्यक्ष हल्लेखोरांना मदत केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नमूद केले. आरोपीविरुद्ध उपलब्ध मौखिक, दस्तऐवजी, तांत्रिक, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल पुरावे त्याचा सहभाग दर्शवतात, असेही न्यायालयाने नमूद केले. आरोपीने दीर्घकाळ कारावास व जलद सुनावणीच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, प्रकरणातील आरोपींकडून वारंवार दाखल करण्यात आलेल्या जामीन व डिस्चार्ज अर्जांमुळे खटल्यास विलंब झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने अखेरीस आरोपीविरुद्धचे आरोप प्रथमदर्शनी सत्य असल्याचे मानण्यास पुरेसा आधार असल्याचे निरीक्षण नोंदवत जामीन अर्ज फेटाळून लावला.