ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायतला कुलूप

सरपंच सुट्टीवर, ग्रामसेवक अनुपस्थित वागडोहच्या ग्रामसभेत प्रचंड गोंधळ

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
पथ्रोट
Villagers lock up the Gram Panchayat office जिल्हा परिषद पथ्रोट सर्कल मधील वागडोह या गट ग्रामपंचायतमध्ये बुधवार १९ ऑगस्टला नियमित ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, यामध्ये ग्रामरोजगार सेवकाच्या निवडी बाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर निर्णय न झाल्याने प्रचंड गोंधळ झाला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकल्याची घटना घडली.

grampanchayat 
 
एका ग्रामसेवकाने आपला जीव गमावल्याची घडल्यानंतर ग्रामसेवक युनियनने ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. अशावेळी वागडोह ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामसेवक अनुपस्थित होते. त्या ऐवजी येथील शाळेचे मुख्याध्यापक राजेश गुप्ता यांना सभेचे कामकाज पाहण्याचे करिता नेमण्यात आले होते. सरपंच यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांची ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. विषय पटलावर फक्त घरकुलाचा विषय होता. सभेची सुरुवात झाली त्यामध्ये घरकुल विषयाबाबतचे वाचन सुरू होते. सदर सभेमध्ये रोजगार सेवकाची निवड करण्यात यावी व याआधीच्या रोजगार सेवकाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी एकमेव मागणी डोलार, वागडोह, गोंड वाघोली व जनुना येथील ग्रामस्थांनी लावून धरली होती. परंतु, त्यावर चर्चा न होता अध्यक्षांच्या परवानगीने आजची सभा समाप्त करण्यात येत असल्याबाबतचा निर्णय देऊन सभा समाप्त करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून त्या ठिकाणी अचलपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे उपस्थित झाले.
 
कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिस सुद्धा त्या ठिकाणी हजर झाले. परंतु, यावर काहीच तोडगा निघत नसल्याचे पाहून बिडिओ व विस्तार अधिकारी, सचिव व सभेचे अध्यक्ष तेथून निघून गेले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे आपल्या विविध मागणीबाबत तक्रार देऊन सदर विषयांच्या बाबतीत चौकशी करून योग्य निर्णय देण्याची मागणी केली आहे. अन्यथा उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे.
 
रोजगार सेवक कर्तव्यात कसूर करीत असल्याने कारवाईसाठी पंचायत समिती अचलपूर यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर रोजगार सेवकला पद मुक्त करुन नवीन रोजगार सेवकाची नियुक्ती करण्याबाबत नियमानुसार सभेचे आयोजन करून निर्णय घेण्यात येईल.
-निलेश इंगळे