आ. बकाने यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

    दिनांक :19-Aug-2026
Total Views |
देवळी,
wild vegetable festival कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), देवळी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त वतीने आयोजित तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आ. राजेश बकाने यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व, त्यातील पौष्टिक गुणधर्म, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि नागरिकांमध्ये आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रानभाज्या या आपल्या पारंपरिक आहाराचा अविभाज्य भाग असून, ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या आहारात त्यांचा पूर्वीपासून समावेश होत आला आहे. नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणार्या या भाज्यांमध्ये विविध पोषक घटक असल्याने त्यांचे आहारातील महत्त्व मोठे आहे. मात्र, आधुनिक जीवनशैली आणि बदलत्या आहारपद्धतीमुळे पारंपरिक रानभाज्यांचा वापर हळूहळू कमी होत आहे. ही पारंपरिक खाद्यसंस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा महोत्सवांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे आ. बकाने उद्घाटनप्रसंगी म्हणाले.
 
wild vegetable festival
 
उद्घाटनानंतर आ. बकाने यांनी महोत्सवातील विविध स्टॉलला भेट देऊन रानभाज्यांची पाहणी केली. शेतकरी, महिला बचतगट तसेच रानभाज्यांचे संकलन व विक्री करणार्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. विविध रानभाज्यांची नावे, त्यांचे पारंपरिक उपयोग, आहारातील महत्त्व आणि उपलब्धता याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. रानभाज्यांचे आहारातील महत्त्व, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि संवर्धनाच्या पद्धती याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला व शेतकर्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत विविध रानभाज्यांचे सादरीकरण केले. यावेळी देवळी नपचे उपाध्यक्ष राहुल चोपडा, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अरविंद उपरीकर, सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे, उपविभागीय अधिकारी प्रफुल चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, आदी उपस्थित होते.