Zindagi Na Milegi Dobara 2 ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या लोकप्रिय चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मैत्री, प्रेम आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांना नवा आयाम दिला. चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल १५ वर्षे उलटली असली, तरी अर्जुन, कबीर आणि इमरान या तीन मित्रांची कहाणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. आता या चित्रपटाच्या सीक्वेलबाबत दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या दुसऱ्या भागाची चाहते अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. आता झोया अख्तर यांनी स्वतः सीक्वेलबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. ‘द हॉलीवुड रिपोर्टर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’च्या सीक्वेलवर सध्या काम सुरू असल्याचे सांगितले. मात्र, केवळ सीक्वेल बनवण्यासाठी सीक्वेल करायचा नसून, आजच्या काळाशी आणि आधीच्या व्यक्तिरेखांशी प्रामाणिक वाटेल अशी कथा मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या भागात ऋतिक रोशनने अर्जुन, फरहान अख्तरने इमरान, तर अभय देओलने कबीरची भूमिका साकारली होती. तीन मित्रांची स्पेनमधील रोड ट्रिप, त्यांच्या आयुष्यातील नातेसंबंध, संघर्ष आणि स्वतःला नव्याने समजून घेण्याचा प्रवास या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला होता. या तिघांसोबत कतरिना कैफ, कल्कि कोचलिन आणि नसीरुद्दीन शाह यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाच्या प्रदर्शनाला १५ वर्षे झाली असली, तरी तो आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे.
दरम्यान, २०२५ मध्ये ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल हे तिघे एका जाहिरातीत पुन्हा एकत्र दिसले होते. पडद्यावर या तिघांना पुन्हा एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा २’ची चर्चा जोरात सुरू झाली होती. काही चाहत्यांना तर ही जाहिरात सीक्वेलचा टीझरच असल्याचेही वाटले होते.
आता झोया अख्तर यांच्या वक्तव्यामुळे सीक्वेलच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. मात्र, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा २’ची अधिकृत रिलीज डेट किंवा ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल यांच्या सहभागाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे १५ वर्षांनंतर अर्जुन, कबीर आणि इमरान यांच्या आयुष्यात नेमके काय बदलले आणि त्यांची मैत्री पुन्हा कोणत्या वळणावर येणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.