अँटिलिया प्रकरणात वाझे-शर्मांवर आरोप निश्चित

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Accusations fixed on Vaze-Sharma उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याप्रकरणी आणि त्यानंतर घडलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड झाली आहे. मुंबईतील विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण १० आरोपींविरुद्ध औपचारिक आरोप निश्चित केले आहेत.विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी शनिवारी (१ ऑगस्ट) हा आदेश दिला. आरोप निश्चित करताना सर्व आरोपींनी आपण निर्दोष असल्याचा दावा करत आरोप फेटाळले. मात्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध खटला चालविण्यासाठी आरोप निश्चित केल्याने आता या प्रकरणातील सुनावणीला वेग येणार आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना हत्या, कट रचणे तसेच बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्यांचा सामना करावा लागणार आहे. आरोप निश्चित झाल्यानंतर आता साक्षीदारांचे जबाब आणि पुराव्यांची नोंद यासह खटल्याच्या पुढील सुनावणीला सुरुवात होणार आहे.
 
 
 
achun
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर एका एसयूव्हीमध्ये स्फोटके आढळल्याने देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी त्या वाहनाचे मालक म्हणून ओळखले जाणारे ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे खाडीत आढळून आला होता. या दोन घटनांनंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला होता.एनआयएच्या आरोपपत्रानुसार, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेच अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार उभी केली होती. श्रीमंत व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण करून एका उच्चपदस्थ राजकीय व्यक्तीने दिलेले दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. तसेच, स्वतःची 'सुपर कॉप' म्हणून असलेली प्रतिमा पुन्हा निर्माण करण्याचाही त्यामागे उद्देश असल्याचे एनआयएने म्हटले आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, या कटाची जबाबदारी स्वीकारण्यास मनसुख हिरेन यांनी नकार दिला होता. ते संपूर्ण कट उघड करू शकतात, अशी भीती असल्याने त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. सचिन वाझे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा आरोपही एनआयएने न्यायालयासमोर केला आहे.