तत्त्वदर्शन - डॉ. राजेंद्र डोळके
action and renunciation संन्यास हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्यासमोर घरादाराचा म्हणजेच संसाराचा त्याग करून वनात जाऊन राहणे, असे चित्र उभे राहते. आपल्या धर्मशास्त्रात चौथा आश्रम हा संन्यासाश्रम सांगितलेला आहे. परंतु येथे हा अर्थ अभिप्रेत नाही तर ‘कर्मत्याग’ म्हणजे कर्ममुळांचा अथवा कर्मांच्या कारणांचा त्याग हा अर्थ अभिप्रेत आहे. गीतेच्या संपूर्ण निर्मितीलाच कर्मत्यागाचे अथवा कर्मसंन्यासाचे अधिष्ठान आहे. हे युद्ध करण्यात माझ्या हातून पाप घडत आहे अशा समजुतीने अर्जुनाने युद्ध करण्याचे नाकारले आणि तो वनात निघून जातो, असे म्हणाला. म्हणजेच कर्मसंन्यासास तो प्रवृत्त झाला. परंतु श्रीकृष्णाने त्याला कर्मपर धर्म समजावून सांगितला आणि त्याला ताळ्यावर आणून युद्धास प्रवृत्त केले. संन्यास याचा ‘त्याग’ या अर्थाशिवाय आणखी व्यापक अर्थ गीतेला अभिप्रेत आहे; तो पुढे आपण बघूच. मनुष्याला कर्म म्हणजे काही ना काहीतरी करणे, हे जन्मापासूनच चिकटले असते.
न ही कश्चित्क्षणमपि जातू तीष्ठत्यकर्मकृत्
कार्यते ह्यवशः कर्म सर्व: प्रकृतीजैर्गुनणै: ।। (३-५)
असे गीतेत म्हटले आहे. याचा अर्थ कर्म केल्याशिवाय कोणीही एक क्षणदेखील राहू शकत नाही. काही काही कर्मे अशी असतात की ती न केली तरी चालू शकते. परंतु काही काही कर्मे अशी असतात की, ती केलीच पाहिजेत. भूक, तहान, झोप वगैरे अशी कर्मे आहेत. काही काही कर्मे तर देहाला अशी चिकटलेली असतात की, ती नाही करायची म्हटले तरी आपोआपच होतात. थकल्यानंतर आता काहीही करायचे नाही, केवळ आराम करायचा या उद्देशाने बसून राहायचे ठरविले तर बसणे हे देखील एक कर्म होते. बसून बसून मांडी दुखली की इकडचा पाय तिकडे करणे हे कर्म आपोआपच नकळतपणे होते. बसून थकला म्हणून झोपतो म्हटले तर तेथेही या कडावरून त्या कडावर होणे आलेच म्हणजे कर्म आलेच. थोडक्यात मागून पुढून सर्वत्र कर्म व्यापून असते. ते टाकताच येत नाही. इषावास्योपनिषदात ‘कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समा:’ (२) म्हणजे शंभरही वर्षे अर्थात आयुष्यभर कर्मे करीतच जिवंत राहावे म्हणजेच कर्मसंन्यास केव्हाही करू नये हेच सांगितले आहे.
हे झाले आवश्यक कर्माबद्दल. परंतु अपरिहार्य अशा कर्मांशिवाय अशी अनेक कर्मे असतात की मनुष्य ती कोणत्यातरी उद्देशाने म्हणजेच फलाशेने करीत असतो. परंतु त्या कर्माचे फळ त्याला अपेक्षेप्रमाणे न मिळता बऱ्याच वेळा ती दुःखाला कारणीभूत होतात. काही काही वेळा तर त्याचे फळ इतके भयंकर असते की ते भयानक कलहाला कारणीभूत ठरतात. म्हणून कर्मे करण्याला ज्या वासना अथवा इच्छा कारणीभूत होतात त्या वासनांचाच त्याग केला पाहिजे. वासनांचा त्याग केला तर कर्म करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यालाच कर्मसंन्यास समजले गेले आहे. परंतु वासनाक्षय हे एवढे सोपे काम नसते. त्यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो. हा निग्रह प्रत्येकासच शक्य होत नाही. भगवद्गीतेत म्हटले आहे-
कर्मेंद्रियांणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्
इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार: स उच्चते (३-६)
याचा अर्थ जो माणूस कर्म करणाऱ्या इंद्रियांना रोखून धरतो, पण मनाने त्या त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, त्याला मुढात्मा, मिथ्याचारी (ढोंगी) म्हटले आहे. उदा. जो वाणी (जीभ) आवरून धरतो, पण मनातून कोणालातरी शिवीगाळ करतो तो निष्कर्मी नव्हे, तर मिथ्याचारी होय. जे लोक शरीराला आवरतात, पण मनाला (विषयांपासून) आवरत नाहीत, इतकेच नव्हे तर मनाने ते विषय घोळघोळून त्यांचा भोग घेतात आणि संधी सापडली तर शरीरानेसुद्धा भोगण्यास मागेपुढे पहात नाहीत, अशा मिथ्याचारी (किंवा ढोंगी) लोकांची या श्लोकात निंदा आहे. म्हणून प्रथम मनाला आवरणे आवश्यक आहे. पुढच्याच श्लोकात भगवान म्हणतात-
यस्तेंद्रियाणि मनसा नियमारभतेऽर्जुन
कर्मेंद्रियै: कर्मयोगमसक्त: स विशिष्यते (३-७)
हे अर्जुना, जो माणूस इंद्रियांना मनाच्या सहाय्याने ताब्यात ठेवून, अनासक्त होऊन, कर्मेंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाच्या आचरणास प्रारंभ करतो तो श्रेष्ठ पुरुष होय. शरीरावर अंकुश ठेवणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मनावर अंकुश ठेवले जाईल. ज्याचे मन ताब्यात आले आहे त्याचे कान घाणेरड्या गोष्टी ऐकणार नाहीत, ज्याचे मन स्वाधीन झाले आहे तो आपण ज्यांना विषय म्हणून मानतो त्यात रस घेणार नाही. असा माणूस ‘आत्म्या’ला शोभतील अशीच कर्मे करील. म्हणजेच आत्म्याला शरीराच्या बेडीतून सुटका करून घेण्याचा योग साधेल. यालाच ज्ञान किंवा नैष्कर्म्य म्हणतात. हे आत्मज्ञान झाल्यावर पुढे काय करायचे? तर या ज्ञानाचा समाजाला उपयोग करून द्यायचा. व्यक्तीचे समाजाबद्दलही काही कर्तव्य असते. वासनाभाव झाल्याने म्हणजेच सर्व इच्छांचा नाश झाल्याने तो वैयक्तिक आनंद तर उपभोगेल. पण त्याच्या या ज्ञानाचा समाजालाही लाभ होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी समाजातच राहून कर्मे करणे करीत राहणे आवश्यक आहे. मनुष्याला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्याने कर्म सोडून द्यावे म्हणजे कर्मसंन्यास करावा असा अर्थ गीतेला अभिप्रेत नसून त्याने संन्यासवृत्तीने अखंड कर्म करीत असावे, असे गीतेचे म्हणणे आहे. गीतेत म्हटले आहे-
कामान्यां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदु:
सर्वकर्मफफलत्यागं प्राहुस्त्यागम विचक्षण: (१८-२)
अर्थ - इंद्रियसुखलालसेने करावयाच्या कार्यापासून निवृत्त होणाल्या धर्मनिष्ठ लोक अनुभूतीपूर्वक ‘संन्यास’ (स्वतःच्या सुखासाठी कार्य न करता केवळ समाजहितबुद्धीनेच कार्य करणे) म्हणून ओळखतात. संपूर्ण निरपेक्ष कर्तव्यनिष्ठेने समाजकार्याला वाहून घेणे यालाच दूरदर्शी लोक ‘त्याग’ (अपेक्षा, लोभ सोडून वर्ज्यावर्ज्य न मानता सर्व कार्य करणे) असे म्हणतात. अर्थात गीतेतील संन्यासाचा अर्थ कर्म संन्यास असा नसून ज्ञानोत्तर कर्म असा आहे. ‘ज्ञानोत्तर कर्मा’चे अथवा ‘ज्ञानयुक्त कर्मा’चे वर्णन उपनिषदात सुंदर रीतीने करण्यात आले आहे. ईशावास्योपनिषदात म्हटले आहे, जे अविद्येची म्हणजे कर्माची उपासना करतात ते घोर अंधकारात शिरतात. पण जे विद्येची म्हणजे ज्ञानाचीच उपासना करतात ते त्याहूनही अधिक घोर अंधकारात शिरतात. ज्ञात्या लोकांकडून आम्ही असे स्पष्टीकरण ऐकले आहे की, केवळ कर्म किंवा केवळ ज्ञान, त्यापेक्षा प्राप्तव्य वेगळेच आहे. हे प्राप्तव्य, ज्ञान व कर्म या दोघांच्या समुच्चयाने मिळते. जो विद्या व अविद्या (कर्म) हे दोन्ही उपाय एकदमच मिळून जाणतो तो अविद्येने मृत्यूला जिंकतो म्हणजे जिवंत राहतो व विद्येने अमृताचा वासनाभावरूपी आनंदाचा अनुभव घेतो. उपनिषदांतील या श्लोकांवरून ’ज्ञानकर्मसमुच्चय’ हाच खरा आनंदाचा मार्ग आहे, असे सांगितले आहे. अशा ज्ञानयुक्त कर्माने समाजसेवा करणे हाच ’संन्यासा’चा खरा अर्थ होय. पण ’संन्यासा’च्या या खऱ्या अर्थाकडे दुर्लक्ष करून आपल्याकडे विपरीत अर्थच प्रचलित झाला आहे. संन्यास म्हणजे कर्मत्याग करून अरण्यात जाऊन राहणे हीच कल्पना आपल्या मनात येते. याला कारण आपल्याकडे फार प्राचीन काळापासून काही धर्मपंथांनी व तत्वज्ञांनी याच अर्थाचे तत्त्वज्ञान प्रसृत केले. पण हे चूक असून ज्ञानी मनुष्याचा कर्मत्याग हा समाजासाठी घातक असतो.
संन्यास ही एक वृत्ती आहे. त्याग हे या वृत्तीचे प्रमुख लक्षण आहे. परंतु गीतेनुसार हा त्याग संसाराचा नव्हे तर लोभ-मोह-आसक्ती या विकारांचा होय. अशा संन्यस्त वृत्तीने संसारातच राहून परोपकारार्थ कर्म करावे. असे कर्म करताना फलाशेचा त्याग करायचा आणि फलाशेचा त्याग करताना कर्म सोडायचे नाही हीच गीतेची संन्यासाबद्दलची शिकवण आहे.