व्यसनमुक्त युवा, विकसित भारत!

अभियानाचा मोदींच्या हस्ते शुभारंभ

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Addiction-free Youth, Developed India देशातील युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवून विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'व्यसनमुक्त युवा, विकसित भारत' अभियानाची सुरुवात केली. देशभरातील २८ हजारांहून अधिक ठिकाणांवरून १ कोटींहून अधिक युवक या अभियानात सहभागी झाले असून, पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वी सर्वांनी व्यसनमुक्त भारत घडवण्याची सामूहिक शपथ घेतली.या अभियानात पूज्य अम्मा, गुरुदेव श्री श्री रविशंकर, पूज्य दाजी, डॉ. चिन्मय पांड्या आणि स्वामी ब्रह्मविहारीजी यांच्यासह पाच प्रमुख आध्यात्मिक गुरूंनी सहभाग घेतला. याशिवाय विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि अनेक मान्यवरही कार्यक्रमाला उपस्थित होते. ब्रह्मकुमारी, इस्कॉन, चिन्मय मिशन आणि ऑरोविलसह १२५ हून अधिक आध्यात्मिक संस्था, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक संस्था आणि औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने हे अभियान राबवले जात आहे.
 
 
modi
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर या अभियानाबाबत माहिती देताना, युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. ही १०० आठवड्यांची देशव्यापी जनसहभाग मोहीम असून, प्रत्येक रविवारी विविध जनजागृती उपक्रम राबवून समाजातील सर्व घटकांना या अभियानाशी जोडले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  या मोहिमेत १० हजारांहून अधिक ठिकाणांवरील युवकांसह मायभारत (MYBharat), राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, युवा मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि विविध आध्यात्मिक संस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करून निरोगी, सक्षम आणि विकसित भारत घडवण्याचा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.