गोंदिया जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतीतील ‘प्रशासकराज’ वाढणार!

निवडणूक कार्यक्रम लांबण्याची शक्यता

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
4 ऑगस्टला होणारी अंतिम मतदार यादी स्थगित
 
 
गोंदिया, 
gram panchayats of gondia district जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्येच संपली आहे. मुदत संपल्यानंतर या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकराज सुरू आहे. आगामी ऑक्टोबरपर्यंत या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्या या ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या प्रशासकराजमध्ये वाढ होणार आहे.
 
 
gram panchayats of gondia district
 
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात एसआयआर (विशेष सखोल पुनरिक्षण) सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. हे सर्वेक्षण सुरुवातीला 29 जुलैपर्यंत पूर्ण करावयाचे होते. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, विविध कारणांमुळे सर्वेक्षणाची मुदत वाढवून 4 ऑगस्टपर्यंत करण्यात आली. मात्र, अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची निर्धारित तारीख ऐनवेळी स्थगित करण्यात आली असता त्याबाबत कोणत्याही सुचना देण्यात आल्या नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रक्रियेलाही विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसआयआर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणे आणि त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. अंतिम मतदार यादी 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्यास ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता अंतिम मतदार यादीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने निवडणूक कार्यक्रमही पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींची मुदत संपून बराच कालावधी लोटल्याने गावपातळीवर निवडणुकांची प्रतीक्षा वाढली आहे. दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादीबाबत पुढील तारीख तसेच ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. मात्र, अंतिम मतदार यादीची प्रक्रिया स्थगित झाल्यामुळे निवडणूक कार्यक्रमाबाबत अद्याप निश्चितता नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.
- भैयासाहेब बेहरे, निवासी उपजिल्हाधिकारी, गोंदिया