खरात प्रकरणी आता १४ ऑगस्टला सुनावणी

ईडीकडून तब्बल ३ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
नाशिक
ashok kharat दैवी शक्ती अन् भविष्याची भीती दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू कॅप्टन अशोक खरातच्या ४२ कोटी ८८ लाखांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मुंबईच्या विशेष न्यायालयात तब्बल ३ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात खरातची पत्नी कल्पना हिच्यासह सहा जणांवर खटला सुरू झाला असून, पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे.
 

ashok kharat money laundering case: ed files 3000 page chargesheet, next hearing on august 14 
कॅप्टन खरातने नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता भागात अंधश्रद्धेचे जाळे पसरवून नागरिकांना लुटले. या लुटालुटीतून जमा झालेला कोट्यवधींचा निधी त्याने कसा जिरवला, याचा खुलासा ईडीच्या तपासातून झाला आहे. यात त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह संशयित अरविंद बावके, नामकर्ण आवारे, अनिवाश कांडेकर आणि मिलिंद बनकर या हस्तकांचा थेट सहभाग समोर आला आहे.खरातने गोळा केलेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी स्थावर मालमत्ता खरेदी करणे, रोख कर्जे वाटणे आणि आपल्या विश्वासातील लोकांना पैसे देऊन ‘मनी लाँड्रिंग’ करणे असा सिंडिकेट चालविला, असे सीबीआयने म्हटले आहे. ईडीने या प्रकरणात तब्बल ३० प्रमुख साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. खरातच्या आर्थिक व्यवहारांवर थेट आणि पूर्ण नियंत्रण असल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.
 
 
दरम्यान, शनिवार, १ ऑगस्टला मुंबईतील विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कल्पना खरात हजर होत्या, तर मुख्य संशयित अशोक खरात सध्या राहाता, जि. अहिल्यानगर पोलिसांच्या कोठडीत असल्याने त्याला आणता आले नाही. मात्र, त्याची पत्नी कल्पना खरात आणि साथीदार मिलिंद बनकर न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते.ईडीतर्फे विशेष सरकारी वकील अरविंद आघव आणि ऋषभशुक्ला यांनी सर्व संशयितांना नोटीस बजाविल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात २५ मार्च रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ ६ एप्रिल रोजी ईडीने पीएमएलए (मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२) अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल केला. सध्या खरातवर नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता येथे एकूण १७ गंभीर गुन्हे नोंद आहेत.