खरांगणा,
atm broken open using a gas cutter गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून १२.२२ लाखांची रोकड लंपास केली. दरम्यान, चोरीसाठी गॅस कटरचा वापर केल्याने एटीएममध्ये आग भडली. ही आग नेमकी कशी लागली याचा अंदाज बांधणे कठीण असले तरी चोरीचे पुरावे नष्ट करण्यासाठी लाग लावली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मोरांगणा येथे शनिवार १ रोजी रात्री घडली.

येथे आर्वी-वर्धा मार्गावर बँक ऑफ इंडियाचे एटीएम कक्ष आहे. याच एटीएमला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लक्ष केले. चोरट्यांनी या एटीएम कक्षातील एटीएम मशिनला कटरच्या सहाय्याने कापून त्यातील १२ लाख २२ हजाराची रोकड चोरून पोबारा केला. आज रविवारी सकाळी एटीएम फोडल्याचे निदर्शनास आल्यावर खरांगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत पाटील, मनीष श्रीवास, सौरभ अंबाडरे, अमर करणे, उमेश गेडाम, अविनाश नवराते, आकाश कांबळे, गणेश आव्हाड आदींनी तातडीने घटनास्थळ गाठले. दरम्यान, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. या प्रकरणी खरांगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांची चमूही रवाना करण्यात आल्या आहे.
महावितरणच्या कर्मचार्याने विझविली आग
ज्या एटीएमला चोरट्यांनी लक्ष केले हे एटीएम खरांगणा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. एटीएम मधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर महावितरणच्या अनिकेत नामक कर्मचार्याने एटीएमकडे धाव घेत आग विझविली. विशेष म्हणजे ज्या एटीएमला चोरट्यांनी लक्ष केले तेथे रात्रपाळीला सुरक्षा रक्षक नसतो.