भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेची कामे मुदतीत पूर्ण करा

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
पिंपरी
bhama askhed water पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेची सर्व प्रलंबित कामे निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. शहराला नियोजित वेळेत या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून दरवर्षी ६०.७९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच दररोज सुमारे १६७ दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर केला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत भामा आसखेड धरणातून शहरात पाणी आणण्यासाठी विविध टप्प्यांवर वेगाने काम सुरू आहे.
 
 

bhama askhed water  
या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (३१ जुलै) प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन योजनेच्या कामांची पाहणी केली तसेच प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भामा आसखेड धरण ते नवलाख उंबरे येथील बी.पी.टी.पर्यंत टाकण्यात येत असलेल्या १७०० मि.मी. व्यासाच्या उदंचन नलिकेच्या कामाची तसेच तेथून देहूपर्यंत बसविण्यात येणाऱ्या १४०० मि.मी. व्यासाच्या गुरुत्व नलिकेच्या कामाची बारकाईने तपासणी केली.
या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी धरणाच्या पाण्याखाली सुमारे १०० फूट खोल असलेल्या बोगद्यात उतरून जॅकवेलच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा वेग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, उर्वरित कामांना अधिक गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दिल्या.
या वेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दीपक पाटील, उपअभियंता दिनेश फाटक, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांच्यासह संबंधित ठेकेदार कंपन्यांचे प्रतिनिधी आणि प्रकल्प सल्लागार उपस्थित होते."पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी भामा आसखेड पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या योजनेतील कोणत्याही कामात गुणवत्ता आणि सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. सर्व कामे दर्जेदार आणि निश्चित मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचना अधिकारी आणि ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना या योजनेचा लाभ वेळेत मिळवून देणे हे पालिकेचे प्राधान्य आहे," असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.