नागपूर
tilak-patrakar-bhavan समाजातील अन्याय, आजार, समस्या आणि वेदना जगासमोर आणण्यासाठी अहोरात्र धावणाऱ्या पत्रकारांच्या स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होते. बातमीच्या शोधात दिवस-रात्र धावणाऱ्या आणि समाजाच्या आरोग्याचा आरसा दाखविणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज असते. ती अधोरेखित करणारे चित्र रविवारी नागपुरात पाहायला मिळाले.

tilak-patrakar-bhavan टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात दोनशेहून अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांची तपासणी, अत्याधुनिक वैद्यकीय चाचण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक औषधोपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोमलवाडा, उज्ज्वल नगर येथील गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोग्य तपासणीसाठी गर्दी केली होती. धावपळीच्या पत्रकारितेमुळे नियमित आरोग्य तपासणीला वेळ न मिळणाऱ्या अनेक पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेतला.
tilak-patrakar-bhavan शिबिराचे उदघाटन सेंटरचे अध्यक्ष व माजी आमदार संदीप जोशी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि नागपूर विभागाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी माहिती अधिकारी अनिल गडेकर, विनोद देशमुख, शिरीष बोरकर, अनुपम सोनी, प्रभाकर दुपारे, भुपेंद्र गणवीर, महेश उपदेव, धमेंद्र जोरे, शेखर सोनी, एस.एन. विनोद, चंद्रकांत उर्फ सनी शेंडे व रणजीत देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आरोग्य शिबिरात नेत्ररोग, अस्थिव्यंग, हृदयरोग, मेंदूरोग, बालरोग, मूत्ररोग, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, त्वचारोग, मानसिक आरोग्य, क्षयरोग, श्वसनाचे विकार, ग्रंथीचे विकार, दंतरोग आणि कर्करोग यांसह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठीही विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्याने अनेकांनी आपल्या आरोग्य विषयक तक्रारींची तपासणी करून घेतली. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताच्या विविध तपासण्या, क्ष-किरण, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी, ईसीजी, ईएमजी, २ डी इको, मॅमोग्राफी, बीएमडी आणि पीएफटी यांसारख्या अत्याधुनिक तपासण्याही मोफत करण्यात आल्या.
tilak-patrakar-bhavan तपासणी दरम्यान आढळलेल्या आरोग्य विषयक समस्यांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले. आवश्यक औषधोपचारही करण्यात आले. या शिबिरासाठी एम्स तसेच गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. विविध वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञांनी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. पत्रकारिता म्हणजे केवळ बातमी लिहिणे नव्हे, तर समाजाच्या जखमांवर प्रकाश टाकण्याचे काम आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा, रुग्णालयापासून विधानसभेपर्यंत आणि गावखेड्यापासून मंत्रालयापर्यंत धावणारा पत्रकार स्वतःच्या आरोग्यासाठी मात्र वेळ काढू शकत नाही. त्यामुळे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित हे शिबिर वैद्यकीय तपासणीपुरते मर्यादित न राहता पत्रकारांच्या आरोग्याप्रती समाजाची आणि पत्रकार संघटनांची जबाबदारी अधोरेखित करणारे ठरले. त्याची सुरूवात उपराजधानीत झाली. हे शिबीर दरवर्षी व्हावे अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली. आरोग्याची वेळेवर तपासणी झाली तर अनेक गंभीर आजारांवर सुरुवातीलाच नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे अशा शिबिरांची सातत्याने गरज असून, पत्रकारांच्या आरोग्याला पत्रकारितेइतकेच महत्त्व देण्याचा संदेश या उपक्रमातून मिळाला. एम्सच्या डॉक्टर चमूत डॉ. अंकिता चव्हाण, डॉ. गौत्तम, डॉ.अथर्व डांगे, डॉ.पूर्वा देशमुख, डॉ. रश्मी ठाकूर, डॉ. प्राची दीक्षित, डॉ. अंकिता कोल्हे, डॉ.निकिता राज डॉ. वेंकट रेड्डी, डॉ. श्री थोते आदी विविध विभागांचे डॉक्टर होते.