रोखठोक,
दिनेश गुणे,
changes-in-the-lifestyle-of-society : शहरीकरण आणि जागतिकीकरणामुळे समाजाच्या जीवनशैलीमध्ये जे काही बदल होत गेले, त्यामध्ये आचार संस्कृतीबरोबरच आहार संस्कृतीचादेखील समावेश होतो. जागतिकीकरणामुळे खाद्यसंस्कृतीनेही पारंपरिक आणि भौगोलिक सीमारेषा ओलांडल्या आणि जाहिरातींच्या जगाने दृक्श्राव्य माध्यमांचे बोट धरून जागतिक खाद्यसंस्कृतीला घरोघरी पोहोचविले. जाहिरातींचा समाजमनावर प्रचंड पगडा असल्याने, जाहिरातीतून सांगितले जाते ते सारेच चांगले असा समज समाजात फैलावत गेला. एकदा मनावर ताबा मिळविला, की विचारांची दिशा हवी तशी वळविता येते, हे जाहिरात क्षेत्राचे गुपित असते. त्यामुळे मनावर ताबा मिळविण्याची जाहिरातींची किमया संथ असली, तरी सहसा अपयशी ठरत नाही हे स्पष्ट झाल्यावर जागतिक आहारसंस्कृतीने जाहिरातींच्या माध्यमातून घराघरात प्रवेश केला, आणि जेवणाच्या पारंपरिक पद्धती हद्दपार झाल्या.
सौजन्य: एआय
जीवनशैलीतील या बदलाचे सूक्ष्म निरीक्षण केले, तर गेल्या शतकभरात माणसाच्या कौटुंबिक राहणीमानात होत गेलेल्या बदलाचे टप्पेदेखील मनोरंजक आणि कदाचित, चिंताजनक देखील वाटू लागतात. गेल्या काही दशकांत संपर्क माध्यमांच्या क्षेत्रात अनाकलनीय वेगाने क्रांती झाली, दळणवळणाच्या साधनांमध्ये कमालीची प्रगती झाली, आणि जीवनशैलीच्या सांस्कृतिक सीमारेषा पुरत्या पुसल्या गेल्या. एकूणच जगभर सर्वच क्षेत्रांत सुरू असलेल्या वेगवान प्रगतीमुळे जग जवळ येत असताना, बदल ही प्रक्रिया अपरिहार्य असते. बदल हीच आजच्या काळाची शाश्वत गोष्ट आहे हे एकदा मान्य केले, की बदल स्वीकारण्याची मानसिकतादेखील आपोआप तयार होत असते, आणि आपण कसे बदलत गेलो हे लक्षातदेखील येत नाही. सुमारे सातआठ पिढ्यांपूर्वी, घरातील पुरुष मंडळींच पेहराव, पंचा, पागोटे, उपरणे, असा असायचा, आणि महिला ‘लुगडं’ नेसायच्या. काळाबरोबर बदल होत गेला, आणि पंचा-उपरण्याची जागा, धोतर, सदऱ्याने घेतली. कालांतराने समाजात सुधारणेचे वारे वाहू लागले, इंग्रजांच्या जीवनशैलीचा प्रभाव समाजमनावर पडू लागला, विकास होऊ लागला, पायी चालणाऱ्यांच्या घरात सायकल, मोटारसायकल, मोटारीही दिसू लागल्या. सदऱ्यावर कोट आला. वहाणांची जागा चप्पलने घेतली, पुढे आणखी काळ बदलला, तेव्हा धोतर कोटाची जागा पँट-शर्टने घेतली, आणि काही काळाने सुटाबुटांचा जमाना सुरू झाला.
गळ्यात टाय आला, डोक्यावरच्या मुंडाशाची किंवा पागोट्याच्या जागी ‘कॅप’ आली, आणि आता तर ब्लेझर्स वगैरेचा जमाना आला. हा केवळ वेषातील बदल आहे असे वरवर वाटत असले, तरी ते तितकेसे खरे नाही. वेषाबरोबर भाषा बदलत गेली आणि जीवनशैलीबरोबरच आहारशैलीदेखील बदलत गेली. भोजनाच्या पारंपरिक पद्धती बदलल्या आणि जेवणाच्या पंक्तीऐवजी ‘लंच’ आणि ‘डिनर’ संस्कृतीचा पगडा वाढू लागला. न्याहारी-नाश्त्याची जागा ‘ब्रेकफास्ट’ने घेतली, आणि सकाळच्या पारंपरिक नाश्त्याऐवजी ब्रेकफास्ट’च्या संस्कृतीचे बोट धरून फास्ट फूड, ‘जंक फूड’ने घराघरात प्रवेश केला. जीवनशैली आणि आहारशैलीमधील बदलाबरोबरच, संस्कृती आणि भाषाशैलीमध्येही कमालीचा बदल होत गेला. बदलाचा हा प्रवास अनेक दशकांपासून सुरू आहे, आणि आज तो स्थिरावला आहे, असे आता स्पष्ट झाले आहे. कदाचित तो बदलाच्या विश्रांतीचा एखादा टप्पादेखील असेल. तो प्रवास पुढे नव्याने सुरू झाला, तर आणखी किती टप्पे पार पाडले जातील हेदेखील आताच सांगता येणार नाही. कारण बदलाच्या प्रक्रियेच्या प्रवासाने आजचा टप्पा पार करेपर्यंत या प्रवासाची कदाचित आपल्याला कल्पनादेखील आलीच नव्हती. त्यामुळेच, आहारशैली बदलली, भाषाशैली बदलली, पेहरावही बदलत गेले.
आहाराप्रमाणेच, भाषा किंवा संस्कृती यांमधील बदलाची प्रक्रियादेखील अशीच संथपणे सुरू असते. आता समाजात ज्या बदलाची चिंता व्यक्त होऊ लागली आहे, ते बदल काही अचानक झालेले नाहीत. ती प्रक्रियादेखील, अचानक किंवा नकळत, नजरेआड सुरू झालेली नाही. कदाचित, त्या त्या टप्प्यावर या बदलाच्या परिणामांचे गांभीर्य जाणवले नसल्याने त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नसावे किंवा बदलाच्या प्रवाहाच्या जोरदार प्रभावामुळे त्याची पर्वा केली गेली नसावी. भाषेच्या संदर्भात असेच काहीसे झालेले दिसते. मुळात, भाषा ही कधीच अचानक मृत्युपंथाला लागत नाही किंवा अचानक नामशेष होत नाही. ती संथपणे मारली जाते. ती टिकविणे आपल्या हातात नसेल तर किमान ती मारण्याच्या कामात तरी आपला सहभाग असू नये हे त्या वेळी लक्षात येत नसावे. जेव्हा एखादी गोष्ट, परंपरा, नियम, स्वतः तयार केलेला असतो, तेव्हा त्याचे पालन, संगोपन आणि संवर्धन करण्याची मानसिकता सहाजिकच असते. ज्या गोष्टी आपण तयारच केलेल्या नाहीत, त्या जपणे, त्यांचे जतन करणे किंवा नष्ट करण्यात फारसे काही वाटत नसावे. पण मुळात ही मानसिकता देखील योग्य नाही. ज्या गोष्टी आपण निर्माण केलेल्या नाहीत, त्या मारून टाकण्याचा किंवा नष्ट करण्याचाही अधिकारच आपल्याला नसतो, ही बाब लक्षातच घेतली जात नसल्याने भाषा, वेष आदी बाबी सहजपणे कालबाह्य करून टाकल्या जातात. यामुळेच जगभरातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या आहेत. सुसंस्कृत राष्ट्रे म्हणून ओळखले जाणारे जे काही देश जगभरात आहेत, त्यापैकी भारत हा सुसंस्कृत देश आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. थेट कांस्यपूर्व संस्कतीत पाळेमुळे रुजलेल्या, बहुधा जगातील एकमेव सांस्कृतिक परंपरेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे, असेही सांगितले जाते. अशा अन्य अनेक संस्कृतींनी केव्हाच माना टाकल्या आहेत.
अनेक संस्कृतींनी आपला प्राण गमावला आहे, आणि त्यांच्या अवशेषांचे धागे एखाद्या संग्रहालयातून अवशेषांप्रमाणे शिल्लक राहिले आहेत. भारताने मात्र, पाली संस्कृती, परंपरांचा जिवंतपणा जोशपूर्ण रीतीने जपलेला आहे. आजही आपला समाज त्या परंपरांचे, रीतीरिवाजांचे आणि संस्कारांचे पालन करतो, आपल्या परंपरेचे गोडवे गाणाऱ्या कालकथांचे पारायण करतो, त्या परंपरा साजऱ्या करतो, आणि हजारो वर्षांपूर्वी रचल्या गेलेल्या वेदमंत्रांचा श्रद्धेने उद्घोष करतो. कदाचित या अभिमानामुळेच, त्यावर सुरू ्सलेल्या बदलाच्या आक्रमणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नसावे. आता त्या जपण्याची धडपड करावी लागणार याची जाणीव तीव्र झाली आहे. पण ते सोपे नाही. त्या जपायच्या असतील, तर त्यांचे पालन करणारा समाज जगविला, टिकविला पाहिजे. तो समाज टिकवला, तर जतनाची मानसिकता टिकून राहते. तो समाज म्हणजे, आपणच आहोत, हे त्यासाठी अगोदर लक्षात घेतले पाहिजे. आपण स्वतःस तसे जगविले, तर भाषा, पेहराव, संस्कृती, आहारशैली किंवा एकूणच जीवनशैलीदेखील जगविता येते. आपण आपली भाषा, जीवनशैली किंवा आहारशैली समृद्ध करत आहोत, की ती मारून टाकतो आहोत याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे, हे जंतर मंतरवरील जेन-झी नावाच्या पिढीने केलेल्या उग्र आंदोलनामुळे अधोरेखित झाले आहे. या पिढीकडे भारताचे भविष्य म्हणून पाहिले जाते.
त्यांची भाषा, पेहराव आणि संस्कृती हे सारे पाहता, भारताचे भविष्य नेमके कोणत्या दिशेला चालले आहे याचा विचार करणारी एक पिढी आज कदाचित हतबुद्ध झालेली असेल. अर्थात, बदल ही एक शाश्वत प्रक्रिया आहे आणि काळासोबत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे हे एकदा मान्य केले, की हा बदलदेखील स्वीकारावा लागेल अशी मानसिकता असलेली पिढीदेखील समाजात आहे. त्यांच्या विचाराचा अनादर करता येणार नाही. कारण जुन्याच जतन केले नाही तर फारसे काही अडत नाही, अशी स्थिती असल्याने, आपण आपल्या अस्मिताचिन्हांची फारशी चिंतादेखील करत नाही. कुणीतरी ती करायला हवी अ्से मात्र अनेकांस वाटत असते. जेन झीच्या आंदोलनानंतर ज्यांना असे काही प्रकर्षाने वाटू लागले आहे, त्यांनादेखील सलाम करावयास हवा. पण विकासाबरोबर होणाऱ्या बदलाची खंत व्यक्त करण्याआधी, हा बदल आपण स्वतःहून बदलत्या काळाच्या प्रभावामुळे आणि जगतिकीकरणाच्या रेट्यामुळे स्वीकारलेला आहे, हेदेखील मान्य करावयास हवे.
तरीही, या अनपेक्षितपणे आदळलेल्या बदलाच्या परिणामांचे गांभीर्य आता तरी लक्षात येणे गरजेचे आहे. बदलाची प्रक्रिया समाजाने स्वीकारली, त्यामुळेच बदलाच्या प्रक्रियेचा प्रवेश समाजात सहज साध्य झाला हे खरे आहे. पण हा बदल धक्कादायकच आहे, असे मात्र आज अनेकांस वाटत आहे. ही चिंतादेखील बेदखल करून चालणार नाही. हा बदल केवळ भाषेतील नाही. भाषेची संस्कृती तर या बदलाने गिळंकृतच करून टाकली आहे, हे दिल्लीतील आंदोलनात तरुणाईने वापरलेल्या भाषेवरून दिसून आलेच आहे. एका बाजूला भाषांच्या अभिजाततेचे जतन करण्यासाठी एक पिढी वर्षानुवर्षे प्रयत्न करत असते, सरकारी स्तरावरून अशा प्रयत्नांच्या आदर केला जातो, आणि असा काही निर्णय झाला की त्याचे आनंदोत्सवही समाजात साजरे केले जातात. भाषेच्या जतनाची, भाषेच्या परंपरा उजळून टाकण्याची ही प्रक्रिया आता भविष्यात किती काळ सुरू ठेवता येईल, याची चिंता आजच करावी लागणार आहे. कारण बदलाच्या आक्रमणाने या प्रश्नाचे गांभीर्यदेखील गिळून टाकण्यास सुरुवात केली आहे. आता भाषेला मार्दवाचे भान राहिलेले नाही.
भाषा हे धारदार शस्त्र आहे, हे खरे हे पण ते भावनांना अमानवीपणाने भोसकून टाकणारे रक्तरंजित शस्त्र आहे, हेदेखील आता दिसू लागले आहे. हा केवळ भाषेतील बदलाचा परिणाम नाही. भाषेसोबतच, पेहरावातील बदलाचे एक वेगळेच दृश्यदेखील त्या आंदोलनामुळे समाजासमोर आले. भारताच्या भावी पिढीच्या पेहरावाची परंपरा कोणत्या टप्प्यावर येऊन थांबली आहे, हे त्या निमित्ताने जगाने पाहिले. हा बदलदेखील स्वीकारला पाहिजे असे काहींचे मत आहे, आणि तो बदलाच्या प्रभावाचा परिणाम आहे. पेहराव किंवा वेष हे सौंदर्य खुलविण्याचे आणि लज्जारक्षणाचे साधन आहे, असा पारंपरिक समज या पिढीने झुगारून दिला आहे. आता पेहरावाचे नवे पैलू जुन्या पिढीस अस्वस्थ करू लागले असले, तरी कदाचित कालांतराने हा बदल पाहणेदेखील सवयीचे होऊन जाईल. कदाचित, आज या बदलाची चिंता व्यक्त करणाऱ्या समाजातील घटकांच्या घरांपर्यंत हा बदल येऊन दाखल होईल, आणि नकळत किंवा नाईलाजाने त्याचाही स्वीकार करावा लागेल.
आता या बदलाचे काही दुष्परिणाम दिसू लागल्याने, समाज उसासे टाकू लागला आहे. अर्थात, नव्या जमान्यासोबत जीवनशैलीमध्ये घडणारे काही बदल अपरिहार्य होते आणि त्याने समाजजीवनाला एक नवे वळणदेखील दिले हे अमान्य करता येणार नाही. हे बदल समोर येऊन उभे ठाकले असताना पारंपरिक आणि पठडीबाज जीवनशैलीस चिकटून राहण्याचा हट्ट शहाणपणाचा नव्हता, हेही काळासोबत सिद्ध झाले आहे, तथापि, आहारशैली, भाषाशैली यांमधील बदलाचा स्वीकार करताना, जीवनशैलीची अवघी दिशा बदलून आपण पायावर धोंडा मारून घेतला, याची जाणीव आता होऊ लागली असताना, पुन्हा एकदा त्या चुकीची दुरुस्ती करण्याचा विचार बळावत लागला ही चांगली बाब म्हणावी लागेल. एखादी चूक त्याचे दुष्परिणाम दिसू लागल्यावर लक्षात येते, आणि दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी त्या चुकीची दुरुस्ती करण्याची धडपड सुरू होते. जंक फूड आणि फास्ट फूड संस्कृती हा आपल्या आहारशैलीचा भाग कधीच नव्हता. पण तो स्वीकारल्यानंतर त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावे लागणार हे दिसू लागल्यावर खाद्यसंस्कृतीमधील बदल स्वीकारल्याचा पश्चात्ताप आता समाजात उमटू लागला आहे, आणि तो बदल नाकारण्याची मानसिकतादेखील वाढत चालली आहे. नव्या ‘इन्स्टंट’ खाद्यसंस्कृतीमुळे आरोग्याच्या असंख्य समस्या उद्भवत असल्याचे आता स्षष्ट झाले असून, कुपोषण आणि स्थूलपणासारख्या आजारांनी एकाच वेळी बालकांच्या विश्वावर आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्याबरोबरच, मधुमेहासारख्या विकारांनीही या विश्वाकडे आपला मोर्चा वळविल्याची काही उदाहरणे दिसू लागल्याने, बदलाचे बोट धरून आलेली खाद्यसंस्कृती नाकारली पाहिजे, याच्या जाणिवा आता जाग्या होऊ लागल्या आहेत.
एका चुकीच्या दुरुस्तीसाठी सुरू झालेल्या एका लहानशा प्रयत्नाची दखल येथे घ्यावी लागेल. हे प्रयत्न यशस्वी झाले, तर लहानशा प्रयत्नाचे ते मोठे यश ठरेल. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने शाळकरी मुलांच्या खाद्यसंस्कृतीला वळण लावण्याकरिता उचललेले पाऊल स्वागतार्ह ठरते. शाळांच्या परिसरात, पन्नास मीटरच्या परीघात वडापाव, समोसा, शीतपेये, किंवा चिप्स नावाचे कोणतेही पदार्थ खाण्यास व विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने जारी केला आहे. शाळांच्या उपहारगृहात हे पदार्थ बनविले जाणार नाहीत आणि त्यांची विक्रीही केली जाणार नाहीच, पण आता खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या यंत्रणांना योग्यतेचे प्रमाणपत्रही मिळवावे लागणार असल्याने, ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या नव्या मोहिमेचा मोर्चा आता योग्य जागी येऊन थांबला आहे. खाजगी, अनुदानित, सरकारी आणि कोणत्याही शिक्षण मंडळाच्या कोणत्याही शाळेत आता असे पदार्थ विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत. तळलेले पदार्थ, गोड पेये, चॉकलेट, आईस्क्रीमलाही शाळांच्या परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक मुलाच्या पोटात जाणारा अन्नाचा प्रत्येक घास सुरक्षित आणि आरोग्यदायी असलाच पाहिजे, ही या निर्णयामागील कल्पना स्वागतार्ह असली, तरी बदल स्वीकारण्याच्या जमान्यात हा बदल स्वीकारला जाईल का हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. अर्थात, बदल घडविण्याचा हा नवा प्रयत्न यशस्वी झाला, तर त्याचे परिणाम समाजहिताचे ठरतील यात शंका नाहीच!