चिखलदरा (अमरावती),
chikhaldara पावसाच्या सरींनी न्हाऊन निघालेला हिरवागार निसर्ग, धुक्याची शुभ्र चादर, दऱ्याखोऱ्यांतून कोसळणारे झरे आणि थंडगार वारा असा अविस्मरणीय अनुभव पावसाळ्यात फक्त चिखलदरा येथेच मिळतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मेळघाट क्षेत्रात चिखलदरा हे पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटातील हे एकमेव थंड हवेचे पर्यटनस्थळ असून, पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
पावसाळ्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाल्यांनतर क्षमावत जाणाऱ्या उष्णतेसोबत बहरणाऱ्या पानाफुलांनी, हिरवेगार दृश्यांनी आणि त्यात धुक्याची चादर घालून मोहकतेने युक्त निसर्गाला बघण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आतुर असतो. मात्र यात नेमके कुठले ठिकाण निवडावे? हा ही प्रश्न सारखा डोकावत असतो, या यक्ष प्रश्नच सुंदर असे उत्तर म्हणजे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रातील प्रसिद्ध ठिकाण 'चिखलदरा'.
अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले चिखलदरा समुद्रसपाटीपासून सुमारे 1,118 मीटर उंचीवर आहे. अमरावती शहरापासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाणारा घाटरस्ता स्वतःमध्येच एक सुंदर पर्यटन अनुभव ठरतो. वळणावळणाच्या रस्त्यांसोबत डोंगर उतारांवरून वाहणारे छोटे धबधबे आणि दाट हिरवळ पर्यटकांचे मन मोहून टाकतात. चिखलदरामध्ये फिरण्यासाठी अनेक आकर्षक व्ह्यू पॉइंट आहेत. सूर्यास्त पॉइंट, मंकी पॉइंट, मोजरी पॉइंट, मालवीय पॉइंट, प्रॉस्पेक्ट पॉइंट, पंचबोल पॉइंट आणि देवी पॉइंट या ठिकाणांहून मेळघाटचे विहंगम दृश्य पाहता येते. प्रत्येक पॉइंटचे वैशिष्ट्य वेगळे असून, निसर्गप्रेमींसाठी हे सर्वच ठिकाणे खास आकर्षण ठरतात. देवी पॉइंटवरील मंदिर हे मोठ्या दगडाच्या नैसर्गिक घुमटाखाली वसलेले असून, त्या दगडातून सतत झिरपणारे पाणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. पंचबोल पॉइंटवर दिलेला आवाज अनेकदा परत ऐकू येण्याचा अनोखा अनुभव पर्यटकांना मिळतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांना भेट देणाऱ्यांची संख्या अधिक असते.
निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर मनोरंजनासाठीही येथे विविध सुविधा उपलब्ध आहेत. झोपाळे, ब्रेक डान्स, ड्रॅगन झूला, घोडेस्वारी, सायकलिंग, लहान मुलांसाठी मिनी कार राईड यांसारखे पर्याय पर्यटकांना आकर्षित करतात. भीमकुंड परिसरात स्काय सायकलिंगचाही थरार अनुभवता येतो. भटकंतीदरम्यान लागणारी भूक भागवण्यासाठी स्थानिक खाद्यपदार्थांची रेलचेलही येथे पाहायला मिळते. गरमागरम मॅगी, भाजलेले मक्याचे कणीस, लिंबू मीठ लावलेले कणीस, कच्चा चिवडा यांचा आस्वाद पर्यटक आवर्जून घेतात. तसेच विविध हॉटेल्स आणि भोजनालयांमध्ये जेवणाचीही उत्तम व्यवस्था उपलब्ध आहे. यंदाच्या पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील, तर मेळघाटातील चिखलदरा हे बेस्ट ऑप्शन ठरू शकते.