छत्रपती संभाजीनगर,
CJP's new strategy नीट (NEET) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणावर देशव्यापी आंदोलन केल्यानंतर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)ची आता पुढील राजकीय रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीसाठी देशभरातील १५ ते २० प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून, पक्षाच्या आगामी आंदोलनांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नीट आंदोलनानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे वैद्यकीय उपचार घेत असलेले अभिजीत दिपके नुकतेच त्यांच्या मूळ गावी परतले. त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कोर कमिटीची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून, विविध राज्यांतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले आहे.दरम्यान, CJPच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे पक्षावर विविध स्तरांतून आरोपही होत आहेत. पक्षाला मिळणाऱ्या कथित परदेशी निधीची चौकशी करावी, तसेच अभिजीत दिपके यांच्या शिक्षणाचा खर्च आणि त्यांचे वडील, सेवानिवृत्त भगवानराव दिपके यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असून, केंद्रीय तपास यंत्रणांच्या हालचालींकडेही लक्ष लागले आहे.
या बैठकीत E20 इंधन धोरणाविरोधातील आंदोलनावरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर देशव्यापी भूमिका घेण्याबाबत पक्षामध्ये विचारमंथन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी E20 धोरणाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली असून, या आंदोलनाला CJPकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील या बैठकीत पक्षाची पुढील भूमिका काय असेल आणि आगामी आंदोलनांबाबत कोणते निर्णय घेतले जातील, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.