‘विनोदी मालिका, पण सेटवर शांतता’

दयानंद शेट्टीच्या वक्तव्याने ‘तारक मेहता...’बाबत चर्चांना उधाण

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
मुंबई
dayanand shetty  ‘सीआयडी’ मालिकेत ‘दया’ची भूमिका साकारत घराघरात लोकप्रिय झालेल्या अभिनेता दयानंद शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एका गाजलेल्या विनोदी मालिकेच्या सेटवरील वातावरणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दयानंदने कोणत्याही मालिकेचे नाव थेट घेतले नसले, तरी त्याच्या वक्तव्यावरून अनेक चाहत्यांनी त्याचा रोख ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’कडे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
 

dayanand shetty shocking remarks spark taarak mehta ka ooltah chashmah speculation 
मुलाखतीदरम्यान दयानंद शेट्टी म्हणाला, “एक मालिका आहे, जिचं नाव मी घेणार नाही. ती अतिशय लोकप्रिय विनोदी मालिका आहे. अशा मालिकेतील कलाकार सेटवरही हसत-खेळत आणि आनंदी वातावरणात काम करत असतील, अशी अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात सेटवरील वातावरण त्याच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. कलाकार एकमेकांकडे पाहतही नव्हते आणि बोलतही नव्हते.”
या अनुभवाबाबत अधिक सांगताना दयानंद म्हणाला की, “आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो. कॅमेऱ्यासमोर विनोदी दृश्यांचे चित्रीकरण झाल्यानंतर सर्वांचे चेहरे अत्यंत गंभीर होत असत. सेटवरील लोक एकमेकांशी संवाद साधत नव्हते. प्रत्येकजण आपल्या खोलीत निघून जात होता. एका विनोदी मालिकेतील कलाकारांची अशी अवस्था पाहून आश्चर्य वाटलं.”
‘सीआयडी’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या दोन्ही मालिकांच्या कलाकारांनी अनेक विशेष भागांमध्ये एकत्र काम केले होते. त्यामुळे दयानंद शेट्टीने उल्लेख केलेली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च असल्याचा दावा अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर केला आहे.
याउलट ‘सीआयडी’च्या सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना दयानंद शेट्टीने सांगितले की, “आमच्या मालिकेचा विषय गुन्हेगारी तपासाचा असला, तरी पडद्यामागे आम्ही नेहमीच हसत-खेळत काम करत होतो. सेटवरचं वातावरण अतिशय मैत्रीपूर्ण आणि आनंदी असायचं.”
दयानंदच्या या वक्तव्याचा व्हिडीओ dayanand shetty  सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “हे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बद्दलचं कटू वास्तव आहे. भरघोस मानधन मिळत असूनही अनेक कलाकार मालिका सोडून जात आहेत,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर, “दयानंद नक्कीच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’बद्दल बोलत आहे,” असे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे.‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अठरा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या मालिकेतील अनेक कलाकारांनी शो सोडला असून, काहींनी निर्मात्यांविरोधात गंभीर आरोपही केले आहेत. दयानंद शेट्टीच्या वक्तव्यानंतर या चर्चेला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे.