‘खबरांची शहानिशा करा’ धनंजय मुंडेंचा संताप

बीड नियोजन समितीतील वादाच्या चर्चांवर स्पष्टीकरण

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
बीड
dhananjay munde  माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर सुरू असलेल्या काही बातम्या पाहून व्यथित झाल्याचे सांगत त्यांनी संबंधित माध्यमांना कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी त्याची शहानिशा करण्याचे आवाहन केले आहे.
 

dhananjay munde denies reports of argument with bajrang sonawane, urges media to verify news 
धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत आपला आणि विरोधी पक्षातील एका लोकप्रतिनिधींचा कोणताही वाद किंवा खडाजंगी झालेली नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र सौहार्द आणि संवाद कायम असतो, त्याला कुणीही अपवाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.बैठकीतील प्रत्यक्षदर्शींकडून या प्रकाराची खात्री करता आली असती, मात्र अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करून काही लोकांना जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवायचा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्याबाबतही धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुनेत्रा पवार या महिला असून, त्या आधीच कौटुंबिक दुःखातून जात आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्या प्रथमच बीड शहरात आल्या होत्या. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी काही नागरिक मोठ्या आवाजात बोलत असल्याने सर्वांचे म्हणणे स्पष्टपणे समजणे शक्य नसते, असे त्यांनी नमूद केले.
याच संदर्भात नागरिकांनी आपले dhananjay munde  प्रश्न शांतपणे आणि हळू आवाजात मांडावेत, अशी विनंती केल्याचे सांगताना त्याचेही रूपांतर ‘धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दम दिला’ अशा स्वरूपात केले जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ठराविक माध्यम प्रतिनिधींकडून असा अजेंडा राबवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.बीड जिल्ह्यातील बहुतांश पत्रकार जबाबदारीने काम करतात, असे सांगत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा आपण कायम आदर करत असल्याचे म्हटले. मात्र काही पत्रकारांविरोधात आर्थिक गैरव्यवहारासह अनेक तक्रारी यापूर्वी आपल्याकडे आल्या होत्या, असा दावाही त्यांनी केला. मात्र कुणाचेही तरुण वयात नुकसान होऊ नये, या विचाराने वरिष्ठांकडे तक्रार करण्याऐवजी आपण दुर्लक्ष केले, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.कुणाच्याही आर्थिक लाभ किंवा समृद्धीच्या आड येण्याची आपली इच्छा नसल्याचेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. बीड जिल्ह्यात बिघडलेला सामाजिक सलोखा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवून वातावरण खराब करू नये, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.दरम्यान, बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत खासदार बजरंग सोनवणे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात तीव्र शाब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. काही ठिकाणी यासंदर्भातील वृत्तही प्रसिद्ध झाले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी या सर्व चर्चांना नकार देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.