पुणे
dilip walse patil अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) दूध व्यवसायावरील कारवाईवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आंबेगावचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दूध भेसळ किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणात आपला दूरान्वयानेही संबंध सिद्ध झाला, तर एका मिनिटाचाही विलंब न लावता सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन, असे खुले आव्हान त्यांनी राजकीय विरोधकांना दिले आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून एफडीएकडून राज्यभरात तसेच आंबेगाव तालुक्यात दूध व्यावसायिकांची तपासणी करून कारवाई केली जात आहे. ही कारवाई अद्याप सुरू आहे.मात्र, ज्या बाबींशी आपला कोणताही संबंध नाही, त्या प्रकरणांमध्ये आपले नाव जाणीवपूर्वक जोडून राजकीय प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न काही विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप वळसे पाटील यांनी केला आहे. दूध भेसळ करणारी कोणतीही व्यक्ती, कंपनी किंवा संस्था असो, आपण कधीही कोणाच्याही पाठीशी उभे राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
एफडीए आणि पोलीस प्रशासन dilip walse patil अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे सांगत त्यांनी भेसळ करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नसल्याचेही नमूद केले.दरम्यान, आपल्यावर खोटे आणि निराधार आरोप करून राजकीय अडचणीत आणण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधकांनी ही खोडसाळ बदनामी त्वरित थांबवली नाही, तर त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात फौजदारी कारवाईसह मोठ्या आर्थिक अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा थेट इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.आपण नेहमीच स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण केले असून, जनता, समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी या कथित राजकीय षडयंत्राची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अखेरीस सत्याचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.