आई-वडिलांच्या हस्तक्षेपाने मुलीचा संसार तुटण्याच्या काठावर !

प्रेमविवाहाला लागली अहंकाराची दृष्ट

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |


अनिल कांबळे
नागपूर

parental-interference-daughters-marriage कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. शिक्षण संपताच कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन दोघांनी प्रेमविवाह केला. दोन अपत्य होईपर्यंतच्या मुलीच्या सुरळीत संसारात आई-वडिलांनी विघ्न घातले आणि मुलीचा संसार तुटण्याच्या काठावर आला. पती दोन्ही मुलींना डोळेभरून बघण्यासाठी तासन्तास उभा असतो तर अहंकाराने व्याप्त पत्नीने विभक्त होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.

 
marraige break
 
parental-interference-daughters-marriage राजेश (काल्पनिक नाव) हा मूळचा पुण्याचा तर पूनम (काल्पनिक नाव) ही नागपूरची. राजेश हा पुण्यात कला शाखेत तर पूनम ही एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. पूनमचे आईवडील दोघेही डॉक्टर तर राजेशची आर्थिक स्थिती जेमतेम होती. दोघांची कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ओळख झाली. काही दिवसांत मैत्री आणि त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रेमविवाह करण्याचे ठरविले. राजेश हा एका कंपनीत आर्टिस्ट म्हणून नोकरीला लागला तर पूनम ही एका खासगी रुग्णालयात नोकरीला लागली. दोघांनीही आई-वडिलांसोबत लग्नाबाबत बोलण्याचे ठरविले. मात्र, दोघांच्याही कुटुंबीयांनी प्रेमविवाहास विरोध केला. त्यामुळे दोघांनीही कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केले. सुरळीत संसार सुरू असतानाच राजेशच्या कुटुंबीयांनी त्यांना स्वीकारले. त्यांच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या. दोघांनीही पूनमच्या कुटुंबीयांची समजूत घातली आणि त्यांनीसुद्धा स्वीकारले. मात्र, वडिलांचा विरोध कायम होता.


parental-interference-daughters-marriage माहेरचा हस्तक्षेप वाढला

पूनमच्या आई-वडिलांचा मुलीच्या संसारात हस्तक्षेप वाढला. पती-पत्नीने पुण्यात फ्लॅट घेण्याचे ठरविले तर आईने पूनमच्या नावावर फ्लॅट घेण्याचा हट्ट केला. त्यानंतर राजेशच्या आई-वडिलांना पुण्यात येऊ नये अशी अट घातली. पूनमच्या भावाचा आणि वहिनीचाही हस्तक्षेप संसारात वाढला. आईवडील पुण्यात आले आणि पूनमला माहेरी नागपुरात आणले. त्यानंतर फ्लॅटमध्ये कर्ज काढून फर्निचर करायला सांगितले. हे सर्व झाल्यानंतर पूनमला परत पाठविणार नाही, असा निरोप दिला.


parental-interference-daughters-marriage हतबल पतीची न्यायासाठी धडपड

दोन्ही मुलींसह माहेरी आलेल्या पूनमने थेट भेटण्यास नकार दिला. त्यानंतर घटस्फोटाची मागणी केली. या निर्णयाने राजेश अचंभित झाला. ती मुलींनाही भेटू देत नव्हती. हतबल झालेल्या राजेशने सुरुवातीला भरोसा सेलमध्ये धाव घेतली. तेथे समुपदेशनानंतरही ती पतीकडे परत जायला तयार होत नव्हती. शेवटी मुलीच्या भेटीसाठी राजेशला न्यायालयात धाव घ्यावी लागली. त्याने मुलींच्या प्रेमापोटी पुण्यातील नोकरी सोडून नागपुरात जेमतेम पगाराची नोकरी स्वीकारली. सासऱ्याच्या घरासमोर भाड्याने खोली घेऊन राहायला लागला. अजूनही तो मुली आणि पत्नी परत यावी, यासाठी धडपड करीत आहे. अशाप्रकारे फक्त माहेरच्यांच्या हस्तक्षेपामुळे मुलीच्या संसाराचे ‘तीन तेरा’ वाजले.